मुंबई : महाविकास आघाडीचं सरकार नसतं तर जयंत पाटील भाजपमध्ये असते, असा दावा भाजपचे खासदार नारायण राणे यांनी केला आहे. राणेंच्या या दाव्याला आता जयंत पाटलांनी उत्तर दिलं आहे. दुसऱ्यांच्या पक्षात जाण्यापेक्षा मला माझा पक्ष वाढवण्यात जास्त रस आहे, असं जयंत पाटलांनी म्हटलं आहे.
जयंत पाटलांनी ट्वीट करत म्हटलं की, राणे साहेबांची भाजपच्या वरीष्ठ नेत्यात गणती होत नाही हे जाणून खेद झाला. भाजपच्या कुठल्या वरिष्ठ नेत्यांशी माझी कधी, कुठे चर्चा झाली याचा तपशील मला कळला तर माझ्या ज्ञानात भर पडेल. माझ्या पुरते सांगायचे झाले तर माझी भाजपच्या कोणत्याही वरीष्ठ नेत्याशी भाजपमध्ये जाण्याबाबत चर्चा झाली नाही म्हणून हा खुलासा.
मी शरद पवार साहेबांचा कार्यकर्ता असल्याने दुसऱ्या पक्षात जाण्याचा विचार माझ्या मनात कधीच शिवत नाही. त्यामुळे मागील पाच वर्षे सरकारच्या विरोधात विधीमंडळात लढत होतो. दुसऱ्यांच्या पक्षात जाण्यापेक्षा मला माझा पक्ष वाढवण्यात जास्त रस आहे. आलेली सत्ता जाते व ती पुन्हा मिळवता येते ही पवार साहेबांची शिकवण आहे. त्यामुळे सत्ता हा विषय माझ्यासाठी गौण आहे, असं जयंत पाटलांनी म्हटलं.
महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं नसतं तर जयंत पाटील भाजपामध्ये असते, नारायण राणेंचा दावा
नारायण राणेंनी काय म्हटलं होतं?
जयंत पाटील हे या आणि पुढील पाच वर्षे देखील मीच मंत्री असेन असं म्हणाले असतील. कारण, आता जर भाजपचं सरकार असतं तर जयंत पाटील मंत्री असते. तशी तयारी त्यांनी दर्शववी होती. ते आपलं काम करतात बाकी काही बोलत नाहीत. ते माझ्याबद्दल देखील बोलले. पण, मी त्यांचा समाचार इस्लामपूर येथे जाऊन घेणार आहे. भाजपमध्ये जाण्यासाठी सगळी बोलणी भाजपच्या नेत्यांशी त्यांची झाली होती. काही गोष्टींकरता ते थांबले होते. नाहीतर ते आज भाजपमध्ये असते.