रत्नागिरी : महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं नसतं तर जयंत पाटील हे भाजपामध्ये असते, असा दावा नारायण राणे यांनी केला आहे. महाविकास आघाडी सरकारला झालेल्या वर्षपूर्तीनिमित्त सरकारच्या अपयशाबाबत बोलण्याकरता आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना नारायण राणेंनी केलेल्या गौप्यस्फोटावरून आता काही प्रमाणात का असेना पण उलटसुलट चर्चांना सुरूवात झाली आहे.
रत्नागिरी येथे बोलताना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना नारायण राणे यांनी म्हटलं की, जयंत पाटील हे या आणि पुढील पाच वर्षे देखील मीच मंत्री असेन असं म्हणाले असतील. कारण, आता जर भाजपचं सरकार असतं तर जयंत पाटील मंत्री असते. तशी तयारी त्यांनी दर्शववी होती. ते आपलं काम करतात बाकी काही बोलत नाहीत. ते माझ्याबद्दल देखील बोलले. पण, मी त्यांचा समाचार इस्लामपूर येथे जाऊन घेणार आहे. भाजपमध्ये जाण्यासाठी सगळी बोलणी भाजपच्या नेत्यांशी त्यांची झाली होती. काही गोष्टींकरता ते थांबले होते. नाहीतर ते आज भाजपमध्ये असते.
सरकार वर्षभर पूर्णपणे अपयशी ठरलं
महाविकास आघाडी सरकारवरही नारायण राणेंनी जोरदार हल्ला चढवला. सरकार वर्षभर पूर्णपणे अपयशी ठरलं असून राज्यात बेबंदशाही असल्याची टीका राणे यांनी यावेळी केली. सरकारने जनतेला दिलेली कोणतीही आश्वासनं पूर्ण झालेली नसून शेतकरी कर्जमाफीचं काय झालं असा सवाल राणे यांनी केलाय. हे सरकार निकम्म आहे. सध्या राज्यात दडपशाही असून सुशांतचा खून झाला. पण, सरकार मंत्र्यांना वाचवण्यासाठी ही आत्महत्या असल्याचं दाखवत आहे.
शिवाय, यांचं हिंदुत्व काय ते माहित आहे. गद्दारी करून सरकार स्थापन झालं आहे. कोरोनाच्या काळात देखील भ्रष्टाचार झाला असून उद्या मुंबई मनपामध्ये सत्तेत आल्यानंतर याची चौकशी करणार असल्याचं यावेळी नारायण राणे यांनी म्हटलंय. तसेच मराठा आरक्षणाबाबत आम्हाला कोणतीही तडजोड नकोय. कुणामधीलही आरक्षण आम्हाला नकोय. आम्हाला हक्काचं 16 टक्के आरक्षण हवं असल्याचं यावेळी नारायण राणे यांनी म्हटलंय.