जालना: मराठा समाजाला त्यांच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करण्याचा हक्क आहे. मात्र, त्यांना हा हक्कच नाकारणे, ही अयोग्य गोष्ट आहे. मनोज जरांगे अंतरवाली सराटीत मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत आहेत म्हणून पलीकडच्या गावात दुसरे आंदोलन उभारण्यात आले किंवा तिथे मुद्दाम कोणाला तरी बसवण्यात आले का, याबाबत चर्चा होणे साहजिक आहे, अशा शब्दांत संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांच्या हेतूविषयी अप्रत्यक्षपणे शंका उपस्थित केली. ते सोमवारी अंतरवाली सराटीत येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.


मनोज जरांगे यांच्या अंतरवाली सराटी येथील उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी उपोषणस्थळी भेट देऊन मनोज जरांगे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, संवैधानिक पद्धतीने मागणी मांडण्याचा अधिकार सर्वांना असतो. पण कोणी आंदोलनच करु नये, हे बरोबर नाही. तुम्हालाही तुमचा अधिकार आहे ना. कोणची भूमिका बरोबर हे सरकार आणि न्यायालय ठरवेल. त्यामुळे एका गावात दोन आंदोलनं करणं मला पटलेलं नाही, असे संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले.


ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंना भेटणार का?


या पत्रकारपरिषदेत संभाजीराजे छत्रपती यांना तुम्ही ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांना भेटणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले की, मी स्पष्ट सांगितलंय की, मुद्दा रास्त असेल, संवैधानिक पद्धतीने त्यांनी आपल्या मागण्या मांडल्या असत्या तर मी तिकडे गेलो असतो.  पण तुमही बोलताय, इतर समाजातील लोकांनी आंदोलन करायचे नाही, त्यांना अदिकारच नाही. त्यासाठी दुसऱ्या बाजूने आंदोलन सुरु करायचे, हा ईर्ष्या निर्माण करण्याचा प्रकार आहे, असे संभाजीराजे यांनी म्हटले. 


हा शाहू ,फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, हा संतांचा महाराष्ट्र आहे. आपल्या मागण्या मांडणे हा संवैधानिक हक्क आहे. शिवाजी महाराजांनी सगळ्या घटकांना घेऊन स्वराज्य निर्माण केले. घटनात्मक पद्धतीने कोणी आंदोलन करू शकते. रस्त्याने मारहाण होतेय, रस्ते अडवले जात आहे हे बरोबर नाही, ही आपली परंपरा नाही. माझी सगळ्या समाजातील लोकांना विनंती आहे कोणत्या आंदोलनाला गालबोट लागेल, कोणत्या आंदोलनातून हिंसाचार होईल, असं कोणीही करू नये. दोन जाती आणि दोन समाजात तेढ निर्माण होईल वातावरण गढूळ होऊ शकते, असं कोणीही करू नये, अशी माझी सर्व समाजाला विनंती असल्याचेही संभाजीराजे यांनी सांगितले.



आणखी वाचा


अंतरवली सराटीत उपोषणाच्या सातव्या दिवशी मनोज जरांगेंची तब्येत प्रचंड खालावली, उठून बसणंही मुश्कील, संभाजीराजे छत्रपती अंतरवाली सराटीत दाखल