Manoj Jarange Mumbai March : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) आजपासून मुंबईच्या (Mumbai) दिशेने निघाले आहेत. दरम्यान, त्यांच्या याच आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी मराठवाड्यातील (Marathwada) नांदेड (Nanded), लातूर (Latur), बीड (Beed), हिंगोलीसह (Hingoli), परभणीतील (Parbhani) हजारो मराठा आंदोलक मुंबईकडे रवाना झाले आहेत. सोबतच वाहनांमध्ये राहण्याची आणि अन्नधान्य, पाण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. त्यामुळे एकट्या मराठवाड्यातील लाखो मराठे मुंबईत दाखल होणार आहेत. 


हिंगोलीत मराठा आंदोलक मुंबईकडे रवाना..


मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे आज आंतरवाली सराटीहून मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. मनोज जरांगे यांच्या याच आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी हिंगोलीच्या कुरुंदा गावांमधून 400 ते 500 मराठा समाज बांधव रवाना झाले आहेत. हे मराठा बांधव पुढे मनोज जरांगे यांच्यासोबत मुंबईत पोहोचणार आहेत. दरम्यान, आंदोलन काळामध्ये लागणारे अन्नधान्य यासह इतर साहित्य घेऊन हे मराठा समाजबांधव आज निघाले आहेत. गावकऱ्यांच्या वतीने वाजत गाजत या सर्व मराठा समाज बांधवांना आंदोलनासाठी पाठवण्यात करण्यात आले आहे. 


परभणीतील मराठा समाजबांधव मुंबईकडे रवाना 


मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे निघण्याचे आवाहन करत, स्वतः मनोज जरांगे मुंबईकडे रवाना झाले आहेत. दरम्यान, परभणी जिल्ह्यातील गावागावातून मराठा बांधव हे मुंबईकडे रवाना झालेले आहेत. परभणीच्या लिमला येथील अनेक मराठा बांधव हे सर्व साहित्य घेऊन अंतरवालीमार्गे मुंबईकडे रवाना झालेले आहेत. मुंबईमध्ये किती दिवस आंदोलन चालेल हे माहीत नसल्यामुळे खाण्यापिण्याचा सर्व साहित्य, मनोज जरांगे यांच्या प्रतिमेचे टी-शर्ट घालून, भगवा रुमाल घेऊन जोरदार घोषणाबाजी करत हे तरुण आंतरवालीमार्गे मुंबईकडे रवाना झालेत. तर, आरक्षण घेऊनच परत येणार असल्याचा निर्धार या तरुणांनी केलाय. 


नांदेडमधून हजारो मराठे मुंबईकडे रवाना...


मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या आंदोलनाला साद घालीत नांदेड जिल्ह्यातून हजारो मराठा आंदोलक आपल्या वाहनातून आंतरवाली सराटीमार्गे मुंबईला निघाले आहे. जरांगे पाटील यांच्यासोबत पायी रॅलीमध्ये सहभागी होऊन हे आंदोलक मुंबईपर्यंत प्रवास करणार आहेत. तसेच, 26 तारखेपासून सुरु होणाऱ्या आझाद मैदानावरील उपोषणात देखील तरुण सामील होणार आहेत.


बीड जिल्ह्यातील मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेने रवाना...


मराठा आरक्षणाची निर्णायक लढाई लढण्यासाठी बीडमधील मराठा समाज बांधव मुंबईकडे निघाले आहेत. शहरातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन करून आंतरवाली सराटीकडे मराठा समाजबांधव रवाना झाले आहेत. यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.  जरांगे पाटील यांच्या लढ्यात आम्ही साथ देणार असूनम, मुंबईहून आरक्षण घेऊन येणार असल्याच्या भावना आंदोलकांनी व्यक्त केली. सरकार आरक्षण प्रश्नावर वेळ काढूपणा करत असून, आता कोट्यावधी मराठे मुंबईत गेल्यावर जो प्रश्न निर्माण होईल त्यालाही सरकार जबाबदार असेल. त्यामुळे, सरकारने आरक्षण प्रश्नावर तात्काळ निर्णय घ्यावा, अशी आमची अजूनही मागणी असल्याचे आंदोलक म्हणाले. 


लातूर जिल्ह्यातील 30 हजार आंदोलक मुंबईकडे...


मराठा आरक्षणाचा लढा आता मुंबईतून लढवणार अशी हाक देणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकवठलेला मराठा समाज आंतरवली सराटी येथून मुंबईकडे निघाले आहे. लातूर जिल्ह्यातून 30 हजारापेक्षा जास्त मराठा बांधव मुंबई येथे होणाऱ्या आंदोलनात सहभागी होणार आहे. हे आंदोलक तीन टप्प्यात मुंबईकडे रवाना होताना दिसत आहेत. ज्यात पहिल्या टप्प्यात मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर आंतरवली सराटीतून, दुसऱ्या टप्प्यात लातूरवरून थेट पुण्याला जाणारी एक टीम असेल, तर काहीजण थेट मुंबईला दाखल होत होणार आहे. अशा तीन टप्प्यात हजारो वाहनं आपल्यासोबत घेत लातूर जिल्ह्यातील तीस हजारपेक्षा अधिक मराठा आंदोलक मुंबईत दाखल होणार आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या: 


मुंबईला निघण्यापूर्वी मनोज जरांगे भावूक, भर पत्रकार परिषेदत ढसाढसा रडले; म्हणाले आता गोळ्या घातल्या तरी माघार नाही...