जालना : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे आंदोलन सुरु असतांना गावकरी आणि पोलिसांत झालेल्या झटापटीनंतर दगडफेक आणि लाठीमार करण्यात आल्याची घटना समोर आली. या घटनेचे अनेक व्हिडीओ देखील समोर आले आहेत. दरम्यान, ज्यात गावकरी आणि पोलीस देखील जखमी झाले आहेत. तर पोलिसांनी अचानक कारण नसताना लाठीमार केल्याचा आरोप होत असतानाच, आता पोलिसांची देखील बाजू समोर येत आहे. चार दिवसापांसून मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांची प्रकृती खालावत असल्याने, त्यांना उपचार घेण्याची विनंती करण्यासाठी गेलो असता आमच्यावर अचानक हल्ला करण्यात आल्याचा दावा जखमी महिला पोलिसांनी केला आहे. 


'एबीपी माझा'शी बोलताना जखमी महिला पोलीस म्हणाल्या की, मनोज जरांगे यांची प्रकृती खालावत असल्याने त्यांना उपचार घेण्याची विनंती करण्यासाठी आम्ही आंदोलनाच्या ठिकाणी गेलो होतो. समोर महिला असल्याने आम्ही महिला पोलीस कर्मचारी आणि अधिकारी पुढे थांबलो होतो. दरम्यान, मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा करत असतानाच काही लोकांनी गोंधळ घालायला सुरवात केली. समोर असलेल्या महिला मागे गेल्या आणि पुरुष समोर आले. हे सर्व सुरु असताना अचानक दगडफेक सुरु झाली. काही कळण्याच्या आतच आमच्यावर हल्ला करण्यात आला. तीन-तीन महिला आमची मागून कॉलर पकडून ओढून मारहाण करत होत्या. डोक्यात विटा मारण्यात आल्या. तसेच संपूर्ण शरीरावर मुका मार मारण्यात आला असल्याचा दावा जखमी महिला पोलिसांनी केला आहे. 


पावसातील गारांप्रमाणे दगडं अंगावर पडत होते? 


आम्ही चर्चा करत असतानाच आंदोलकांनी गोंधळ सुरु केला. आम्ही त्यांना गोंधळ का करत आहेत? असे विचारले. तसेच आम्ही तुम्हाला घेऊन जाण्यासाठी आलो नसून, तुम्ही शांत रहा असे त्यांना सांगितले. पण त्यांच्याकडून थेट दगडफेक करण्यात आली. यावेळी दगड असे पडत होते की, जसे पावसात गारा पडतात. आमचे कपडे पकडून आम्हाला ओढण्यात येत होते. काहीजण तिथे त्यांना सांगत होते की, पोलिसांना पकडा आणि यांना घेराव घाला. यांना आपण मारू असे सांगितले जात होते, असाही दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे. तर, यावेळी गावकऱ्यांनी केलेल्या मारहाणीत संपूर्ण शरीराला मुका मार लागला असून, डोक्याला 10 टाके पडल्याचे देखील एका जखमी महिला पोलिसांकडून सांगण्यात आले. जालना येथील रुग्णालयात या जखमी पोलिसांवर उपचार करण्यात येत आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


जालन्यात आजही मराठा समाज आक्रमक, आंदोलक तरुणानं स्वतःची दुचाकी पेटवली; व्हिडीओ व्हायरल