अंतरवाली सराटी (जालना) : मुंबईतील बैठकीनंतर शासनाकडून आलेला मराठा आरक्षणासंबंधीत नव्या जीआरचा प्रस्ताव मनोज जरांगे यांनी फेटाळला आहे. मुंबईत सरकार आणि उपोषणकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या शिष्टमंडळाची शुक्रवारी रात्री बैठक झाली होती. त्यामुळे जरांगे आज काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. दरम्यान, जरांगे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शासनाच्या जीआरमध्ये कोणतीही दुरुस्ती झाली नसल्याने माझे उपोषण सुरूच राहणार असल्याची भूमिका जरांगे यांनी स्पष्ट केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सरकारचं प्रयत्न अपयशी ठरला असून, जरांगे यांचे उपोषण सुरूच राहणार आहे. 


लाठीचार्ज करणाऱ्या अधिकाऱ्यांवर अजुनही कठोर कारवाई करण्यात आलेली नाही, फक्त सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. आमच्यावर गोळ्या झाडणारे अधिकारी शिष्टमंडळात फिरत आहेत. आमच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे, अशी मागणी जरांगे यांनी केली आहे. 


सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याचे आदेश काढा...


सरकारने जीआर काढल्यावर त्यात निजामकालीन कुणबी नोंद असलेल्यांना तत्काळ कुणबी प्रमाणपत्र देण्याचा उल्लेख करण्यात आला होता. मात्र, मनोज जरांगे यांनी हा जीआर अमान्य करत, त्यात उल्लेख असलेला वंशावळ हा शब्द काढून सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली होती. त्यानुसार, शुक्रवारी पुन्हा एकदा सरकार आणि जरांगे यांच्या शिष्टमंडळाची बैठक झाली. या बैठकीनंतर मुख्यंमत्री एकनाथ शिंदे आणखी नवीन जीआरचा मसुदा बंद पाकिटात मनोज जरांगे यांना पाठवला होता. तसेच उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. मात्र जरांगे यांनी हा मसुदादेखील धुडकावून लावला आहे. तसेच सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा उल्लेख असलेला जीआर काढण्याची मागणी केली आहे. तसेच जोपर्यंत असा जीआर निघणार नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केले आहे. 


पाहा व्हिडीओ : Manoj Jarange Speech Full : माझ्या पाठीवर थाप तिचा कचरा होऊ देणार नाही, 'सरसकट'वर जरांगे कायम



मुख्यमंत्र्यांनी पाठवले जीआर... 


मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी शुक्रवारी रात्री मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली. या बैठकीत मनोज जरांगे यांचे एक शिष्टमंडळ देखील उपस्थित होतं. यावेळी आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा झाली. तसेच, जरांगे यांच्या शिष्टमंडळाचे म्हणणं ऐकून घेत सरकारने काही बदल करण्यास सहमती दर्शवली असल्याची देखील माहिती आहे. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटील यांना एक बंद पाकिटात जीआर देखील पाठवले आहे. हेच बंद पाकीट घेऊन शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर अंतरवाली सराटी गावात दाखल झाले. त्यांनी हे जीआर मनोज जरांगे यांना दिले असून, त्यानंतर झालेल्या चर्चेनंतर जरांगे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


अर्जुन खोतकर जरांगेंच्या भेटीला, मुख्यमंत्र्यांचं पत्र दिलं, पण जरांगे म्हणाले...