जालना : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी उद्या (29 ऑगस्ट) रोजी जालन्यात भव्य आंदोलन केले जाणार आहे. शहागड येथील पैठण फाट्यावर मराठा समाजाच्या वतीने हे आंदोलन केले जाणार आहे. आरक्षण मिळावे व इतर मागण्यासाठी हे जनआक्रोश आंदोलन होत असून, या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. ज्यात औरंगाबाद आणि जालना या दोन्ही जिल्ह्यातील पोलिसांकडून वाहतूक बदल करण्याबाबत पत्र काढण्यात आले आहे.  


जालना येथील पैठण फाट्यावर होणाऱ्या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. तर, वाहनांच्या रहदारीमुळे क्षुल्लक बाबीवरुन वादग्रस्त परिस्थिती निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे यामार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी जालना आणि औरंगाबाद पोलिसांकडून वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. ज्यात 29 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 8.00 ते संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत पर्यायी मार्गाचे आदेश जालना पोलीस दलाचे अपर पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे यांनी जारी केले आहे. तर औरंगाबाद ग्रामीण पोलिसांकडून देखील असेच आदेश काढण्यात आले आहेत. 


जालना पोलिसांचे आदेश...



  • जालना-अंबड-वडीगोद्री शहागड मार्गे बीडकडे जाणारी वाहने ही पर्यायी मार्ग अंबड घनसावंगी-आष्टी-माजलगाव मार्गे बीडकडे जाईल.  

  • शहागड मार्गे साष्ट पिंपळगाव-पैठणकडे जाणारी वाहने ही पर्यायी मार्ग शहागड-महाकाळा-साष्ट पिंपळगांव मार्गे पैठणकडे जाईल. 

  • पैठणकडून शहागडकडे येणारी वाहणे ही पर्यायी मार्ग साष्ट पिंपळगाव-महाकाळा-शहागडकडे जातील. 


औरंगाबाद पोलिसांचे आदेश... 



  • औरंगाबाद-पाचोड शहागड मार्गे बीडकडे जाणारी सर्व वाहने हे पाचोड पैठण-उमापुर-बीड या पर्यायी मार्गाने जातील.

  • बीड-शहागड-पाचोडमार्गे औरंगाबादकडे जाणारी सर्व वाहने हे बीड-उमापूर-पैठण-पाचोड या पर्यायी मार्गाने जातील.


मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता...


गेल्या अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणाची मागणी मराठा समाजाच्या वतीने करण्यात येत आहे. यासाठी मागील काही काळात मोठ्या प्रमाणात मोर्चे देखील काढण्यात आले. एक मराठा लाख मराठा म्हणत राज्यभरात लाखोच्या संख्येने मोर्चे काढण्यात आले होते. तर, जालना शहरात देखील मराठा क्रांती मोर्च्याच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. मात्र, मोर्चे काढून आणि आंदोलन करुन देखील आरक्षणाची मागणी पूर्ण झाली नाही. त्यामुळे आता पुन्हा एकदा मोर्चे काढण्यात येत आहेत. मागील महिन्यात औरंगाबाद शहरात देखील असाच मोर्चा काढण्यात आला होता. आता जालना येथील शहागडमध्ये पैठण फाट्यावर हा मोर्चा काढला जात आहे. तर यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Ashok Chavan : तोपर्यंत काहीच होणार नाही, झुलवत बसू नका; मराठा आरक्षणावरून अशोक चव्हाणांनी शिंदे-फडणवीस सरकारला ठणकावलं