जालना (आंतरवाली सराटी) : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी आज जालना येथील आंतरवाली सराटी गावात आज भव्य अशी जाहीर सभा होत आहे. यावेळी मनोज जरांगे यांचे भाषण होणार आहे. दरम्यान, या सभेसाठी राज्यभरातून मराठा बांधव आंतरवाली गावात दाखल होत आहे. आतापर्यंत देशात कधी नव्हे अशी गर्दी या सभेत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही सभा आज इतिहास घडवणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, यासोबतच मनोज जरांगे आजच्या सभेतून नेमकं काय बोलणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
या मुद्द्यांवर असणार मनोज जरांगे पाटील यांचे भाषण
- सरकारला देण्यात आलेल्या 40 दिवसांची मुदत संपण्यापूर्वी ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण द्यावे.
- शनिवारी मेळावा संपताच रविवारपासूनच जरांगे पाटील आपल्या राज्यव्यापी दौऱ्याची सुरुवात करू शकतात.
- आंतरवाली सराटी येथील साखळी उपोषण सुरू राहील. व्याप्ती वाढवण्यावर जरांगे पाटलांचा भर असू शकेल.
- जरांगे पाटलांनी सरकारला 40 दिवसांची मुदत दिली होती. ती 24 ऑक्टोबरला संपत आहे. त्यामुळे 24 पासून ते पुन्हा आमरण उपोषण सुरू करू शकतील.
- मराठा समाजाला 50 टक्क्यांच्या आतले व ओबीसीतून आरक्षणाचा शासन निर्णय हातात घेऊनच ते आंदोलन मागे घेणार असल्याचे सांगू शकतात.
- काही मंत्री आरक्षणविरोधी वक्तव्ये करीत आहेत, त्यांचाही समाचार घेऊ शकतात.
- मराठा समाज मागास सिद्ध होण्यासाठी 26 पैकी किमान 13 गुण आवश्यक होते. गायकवाड आयोगाच्या अहवालात समाजाला 21.5 गुण दिले आहेत. याचा उल्लेख करू शकतात.
- मराठा आंदोलनात सरकार फूट पाडण्याचा प्रयत्न करू शकते असा आरोप मनोज जरांगे पाटील सातत्याने करीत आहेत. त्यासंदर्भात ते काही गौप्यस्फोट करू शकतात.
लाखो लोकांची गर्दी होण्याची शक्यता...
आमरण उपोषण मागे घेतल्यावर मनोज जरांगे यांनी 12 दिवसांचा राज्याचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी शेकडो गावात जाऊन सभा घेतल्या आणि प्रत्येक ठिकाणी 14 ऑक्टोबरच्या सभेला येण्यासाठी आमंत्रण दिले होते. त्यामुळे एक दिवस आधीपासूनच मराठा बांधव आंतरवाली गावात दाखल होतांना दिसत आहे. त्यामुळे आजच्या सभेला लाखोंची गर्दी होण्याची शक्यता आहे. यासाठी त्यानुसार सोय देखील करण्यात आली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: