Manoj Jarange Patil on Chhagan Bhujbal : तुमचं राजकीय करिअर उद्ध्वस्त नाही केलं तर नाव बदलेन, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांना दिला होता. यावरून भुजबळांनी कावळ्याच्या शापाने गाय मारत नाही, असे प्रत्युत्तर जरांगे पाटलांना दिले. आता यावर मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्या, मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. तर दुसरीकडे जालन्यातली वडीगोद्री येथे ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे गेल्या 10 दिवसांपासून ओबीसी आरक्षणाला (OBC Reservation) धक्का लागू नये, या मागणीसाठी उपोषण करत आहे. राज्य सरकारचे शिष्टमंडळ आज लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी उपोषण मागे घेण्यासाठी जालन्यात दाखल झाले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये छगन भुजबळ यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला असता त्यांनी कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही, असे प्रत्युत्तर मनोज जरांगे पाटलांना दिले.
कुणाच्या शापाने काय होतं हे थोड्या दिवसात कळेल
आता यावर मनोज जरांगे पाटील म्हणाले की, लोकसभेत पडलेले सगळे एकत्र आले म्हणून जास्त खुश होऊ नका. पुढे टाईम आहे. मराठे एक आहेत. मराठा आरक्षणाला आजपासून तरी विरोध करणे बंद करा. मग मराठे तुमच्या मदतीला येतील. कुणाच्या शापाने काय होतं हे थोड्या दिवसात कळेल. थोडे दिवस बाकी आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.
लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाबाबत काय म्हणाले छगन भुजबळ?
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांशी संवाद साधताना लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाबाबत छगन भुजबळ म्हणाले की, सर्वपक्षीय लोकांना बोलवून निर्णय घेण्यात येणार आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, अशी आमची भूमिका असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन लक्ष्मण हाके यांच्याकडे आम्ही जात आहोत. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमरे यांची प्रकृती ढासळत आहे. उपोषण मागे घेण्याची विनंती आम्ही त्यांना करणार आहोत. आत्मक्लेष न करता त्यांनी उपोषण सोडावे, अशी विनंती करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी केली.
इतर महत्वाच्या बातम्या
मोठी बातमी! अजितदादांनी प्रकाश आंबेडकरांसोबत जावं, राष्ट्रवादीच्याच आमदाराचा सल्ला