जालना: ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही, हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे वक्तव्य धादांत खोटे आहे. मी आयोगाचा सदस्य आहे. त्यामुळे मला या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे माहिती आहेत. राज्य सरकारने कायद्यात खाडाखोड करुन 54 लाख कुणबी प्रमाणपत्र वाटली. या माध्यमातून राज्यात बोगस कुणबी (Maratha Kunbi) घोटाळा झाला आहे, असा दावा ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी केला. लक्ष्मण हाके हे गेल्या चार दिवसांपासून जालन्यात ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) रक्षणासाठी प्राणांतिक उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस असून त्यांची प्रकृती खालावली आहे.


मात्र, जोपर्यंत ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकार लेखी आश्वासन देत नाही, तोपर्यंत मी माघार घेणार नाही, असा निर्धार लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केला आहे. मनोज जरांगे पाटील म्हणतात की, मी 80 टक्के मराठा ओबीसीत घुसवला आहे. जरांगे यांचा हा दावा खरा असेल तर मूळ ओबीसींचे आरक्षण कसे टिकेल, हे सरकारने सांगावे. अर्ध्याहून जास्त लोकसंख्येच्या ओबीसींचे हक्क टिकवण्यासाठी मुख्यमंत्री आणि राज्य सरकार काय करत आहे, असा सवाल लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केला. जरांगे म्हणतात त्याप्रमाणे 80 टक्के मराठा समाज कुणबी प्रमाणपत्राच्या माध्यमातून ओबीसी प्रवर्गात घुसला आहे. 


हे ओबीसींच्या हक्कांवरील अतिक्रमण आहे. या पुरोगामी महाराष्ट्रात सामाजिक न्याय उरलाय का, याचं उत्तर मिळाल्याशिवाय मी आमरण उपोषण मागे घेणार नाही, असे लक्ष्मण हाके यांनी म्हटले.


सरकारी शिष्टमंडळ लक्ष्मण हाकेंच्या भेटीला


लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाची सरकारने गंभीर दखल घेत अतुल सावे आणि डॉ. भागवतराव कराड यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ सोमवारी त्यांच्या भेटीला गेले होते. अतुल सावे आणि डॉ. भागवत कराड यांच्याकडून लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांना किमान पाणी पिण्याचा आग्रह करण्यात आला. तुम्ही तुमचं शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीला चला, अशी विनंती अतुल सावे यांनी केली. यानंतर आता लक्ष्मण हाके यांच्याकडून एक शिष्टमंडळ चर्चेसाठी मुंबईला येणार आहे. यावेळी अतुल सावे आणि भागवतराव कराड यांनी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांना किमान पाणी पिण्याचा आग्रह केला. डॉ. भागवतराव कराड यांनी स्वत: लक्ष्मण हाके यांचा रक्तदाब तपासून पाहिला. डॉक्टर म्हणून मला माहिती आहे की, लक्ष्मण हाके यांचा हार्ट रेट वाढलेला आहे. त्यांनी पाणी घेतल नाही तर त्यांना किडनीला त्रास होण्याची शक्यता आहे, असे भागवतराव कराड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.


आणखी वाचा


57 लाख बोगस कुणबी नोंदी रद्द करा, सगेसोयरेंच्या जीआरला विरोध; ओबीसी नेत्यांच्या बैठकीत विधानसभेच्या 288 जागा लढवण्याचा ठराव