Jalna: राज्यात मराठा ओबीसी उपोषण चांगलंच तापताना दिसत आहे. सोमवारी मनोज जरांगेंची प्रकृती बिघडल्याने उपोषणाची चांगलीच चर्चा होती. मराठवाड्यात ठिकठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आला. तर अनेक भागात संमिश्र प्रतिसाद होता. दरम्यान आज परभणीतील मराठा कार्यकर्त्यांना वडीगोद्री गावातून प्रवेश देत नसल्याने आता कार्यकर्त्यांचा मोठा जमाव रस्त्यावर उतरलाय. मराठा कार्यकर्त्यांना अंतरवली सराटीत जाण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्याची विनंती पोलीस करत आहेत.
मनोज जरांगे यांच्या आंदोलन स्थळापासून वडीगोद्रीजवळील धुळे सोलापूर महामार्गावर आंदोलकांनी रास्ता रोको ही केला आहे. या ठिकाणी वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या असून आंदोलन मोठ्या प्रमाणावर जमल्याचं चित्र आहे. वडीगोद्री फाट्यावर सध्या मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पर्यायी मार्गाने अंतरवलीत जाण्यासाठी पोलीस मध्यस्थी करत आहेत.
एक मराठा लाख मराठा घोषणा देत कार्यकर्ते रस्त्यावर
परभणीतून आलेल्या मराठा कार्यकर्त्यांना वडीगोद्री गावातून अंतरवाली सराटीमध्ये जाण्यास प्रवेश देत नसल्याने मराठा आंदोलन आक्रमक झाल्याचे पाहायला मिळतंय. शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून जालना ते वडीगोद्री फाटा येथे मराठा कार्यकर्त्यांनी ठिया धरलाय. एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्या जात असून महिलांची ही लक्षणीय संख्या आहे. मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा आज आठवा दिवस असून त्यांची तब्येत खालावली असल्याची माहिती आहे. त्यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी मराठवाड्याती अनेक जिल्ह्यांमध्ये आंदोलन करण्यात येत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी मागणी करत आज मराठा आंदोलकांनी सोलापूर-धुळे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं. त्यामुळे या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
वाहतूकीचा खोळंबा, वाहनांच्या रांगाच रांगा
जालना ते वडीगोद्री फाट्यापर्यंत जाणाऱ्या सोलापूर धुळे महामार्गावर मराठा कार्यकर्त्यांसह महिलांनीही ठिय्या धरला आहे. धुळे सोलापूर महामार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा असून वाहतूकीचा मोठा खोळंबा झाल्याचं चित्र आहे. या भागात जागोजागी मराठा आंदोलक, कार्यकर्ते जमले असून पोलिसांचाही मोठा फौजफाटा तैनात असल्याचे दिसते.
पर्यायी मार्गाचा वापर करण्याची विनंती
वडीगोद्री गावापासून अंतरवली सराटीत जाण्यासाठी परभणीतून आलेल्या कार्यकर्त्यांना अडवल्याने मराठा बांधव रस्त्यावर उतरले असून अंतरवली सराटीत जाण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्याची विनंती पोलिसांकडून केली जात आहे. वडीगोद्री येथे ओबीसी समाजाचे उपोषण सुरु असून या भागात दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री मराठा ओबीसी आंदोलक आमनेसामने आल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. यानंतर वडीगोद्री ते अंतरवली सराटी जाणाऱ्या मार्गावर मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. याच वडीगोद्री फाट्यावर परभणीतून आलेल्या कार्यकर्त्यांना अडवल्यानं मराठा समाजातील कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याचं समजतंय.
हेही वाचा: