Manoj Jarange Patil : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी  मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावं यासह इतर मागण्यांसाठी अंतरवाली सराटीत आजपासून आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. मनोज जरांगे पाटील हे सातव्यांदा आंदोलनाला बसले आहेत. उपोषणाची सुरुवात करताच मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांच्या मागणीशी मुख्यमंत्री गद्दारी करणार नाहीत, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधला. तसेच, संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांना न्याय मिळेपर्यंत लढणार, असेही मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. 


मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटीत माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, आज 25 जानेवारीपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. उद्या 26 जानेवारीला सगेसोयरेची अधिसूचना काढून एक वर्ष पूर्ण होत आहे. एक वर्ष झालं, मात्र समाज रस्त्यावर आहे. मराठ्यांना सरसकट कुणबी जीआर काढून त्याचे तात्काळ वाटप करण्यात यावे. ज्या मराठ्यांची कुणबी नोंद निघाली त्यांच्या सर्वच सगेसोयऱ्यांना कुणबी प्रमाण पत्र द्यावे. शिंदे समितीचे काम पुन्हा सुरू करून नोंदी सापडून देण्याचे काम करावे. आंदोलनातील दाखल गुन्हे मागे घ्यावेत. हैदराबाद, सातारा, बॉम्बे गॅझेट लागू करावे, या सह आठ-नऊ मागण्या आम्ही सरकारकडे सादर केल्या आहेत. आमच्या नवीन मागण्या नाहीत, या जुन्याच मागण्या आहेत, असे त्यांनी म्हटले. 


संतोष भैयाला न्याय मिळेपर्यंत लढणार


संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली, यासाठी सुद्धा आपण लढायचे आहे. यातील सर्वच आरोपींना फाशीची शिक्षा करण्याची मागणी आपण या आंदोलनात केली आहे. संतोष भैयाला न्याय मिळेपर्यंत आपण लढणार आहोत. सरकारने मराठ्यांच्या मागण्यांची तातडीने अंमलबजावणी करा. मराठ्यांच्या मागणीशी मुख्यमंत्री गद्दारी करणार नाहीत, असे त्यांनी म्हटले.  


फडणवीस साहेबांना उपोषण होईपर्यंत काही बोलणार नाही


ते पुढे म्हणाले की, पूर्वी ढकला-ढकली व्हायची, आता तुम्हीच मुख्यमंत्री आहात. आम्ही फडणवीस साहेबांना उपोषण होईपर्यंत काही बोलणार नाही. मराठ्यांचे पोरं उघडे पडू द्यायचे नसतील तर ते देतील. मराठ्यांच्या मताशिवाय कोणी सत्तेत बसू शकत नाही. आमच्या अन्नात कोण विष कालवतोय हे कळलं पाहिजे, सत्ता दिल्यावर हे आरक्षण देतात का नाही? हे समाजासमोर उघडे होईल. 57 लाख नोंदी म्हणजे दोन करोड मराठे आरक्षणात गेलेत. आजवर फायदे झाले नाहीत असे नाही, फायदे झाले आहेत. शिंदे साहेबांनी नोंदी शोधल्या, अर्थात त्यासाठी लढावे लागले असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले. 


जरांगेंचा वडेट्टीवारांवर पलटवार


विधानसभेचे माजी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी मनोज जरांगेंच्या आंदोलनाला धार राहिली नाही, असे म्हटले. यावरून मनोज जरांगे म्हणाले की, त्यांना अंतरवलीत किती लोक आहेत बघायला येतो का म्हणावं, धार राहिली नाही म्हणे.  आमची लोक मोठे झालेले त्यांना खपतच नाही. निवडणुकीच्या वेळेला तुम्हाला मराठे लागतात. हे मराठ्यांशी टिंगल करतात. आता तर ताकतीने मराठे येणार आहे.तुला उत्तर मराठेच देतील. मी अर्धवट सोडतो तर मग तू बोल. असले विरोधी पक्ष नेते जनतेला लाभतात. हे फक्त कामा पुरते मराठ्यांना पुढे करतात, म्हणून काँग्रेस संपत आली आहे, असा पलटवार त्यांनी यावेळी केला. 


आणखी वाचा 


Manoj Jarange Patil : ही धनंजय मुंडेंची टोळी, तिचा नायनाट होणे गरजेचे; CCTV फुटेज समोर येताच मनोज जरांगेंनी सगळंच काढलं