जालना : पप्पांची खूप काळजी वाटते, आता त्यांचं शरीर त्यांना साथ देत नाही. सरकारमुळेच उपोषणाला बसायची वेळ येतेय. आता पुन्हा त्यांच्यावर उपोषण करण्याची वेळ येऊ देऊ नका, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या कुटुंबियांनी दिली. मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मुंबईत आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम राहत जरांगे यांनी लाखो मराठा बांधवांसह मुंबईच्या दिशेने कूच केलीये. अंतरवाली सराटीमधून 20 जानेवारी निघालेला हा मोर्चा आता मुंबईच्या वेशीवर आलाय. परंतु आता मुंबईत या आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती समोर आलीये. 


दरम्यान आता त्यांच्या कुटुंबियांनी देखील काळजी व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आहे. आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणार असा पवित्रा मनोज जरांगे यांनी घेतलाय. पण आझाद मैदानावर आंदोलन करण्याला पोलिसांनी परवानगी नाकारल्याचं पाहायला मिळतंय. मनोज जरांगे यांचा आजचा मुक्काम हा वाशी येथे असणार आहे. त्यानंतर हे आंदोलन 26 जानेवारी रोजी मुंबईच्या दिशेने कूच करेल. पण या आंदोलनाला परवानगी मिळणार का हे  पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


आजपर्यंत सरकार आपल्या शब्दावर जागलं नाही - सौमित्रा जरांगे (पत्नी)


सरकारकडे अजूनही वेळ आहे. आजपर्यंत सरकार आपल्या शब्दावर जागलं नाही. माझ्या पतीवर पुन्हा उपोषणाची वेळ येऊ देऊ नका. सरकारला हात जोडून विनंती करते, मला माझा पती आणि आरक्षण हवं, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांच्या पत्नीने दिली. 


पप्पांची खूप काळजी वाटते - पल्लवी जरांगे (मुलगी)


पप्पांची खूप काळजी वाटते. शरीर पप्पांना साथ देत नाही. मुलगी म्हणून खूप काळजी वाटते. सर्व मराठी शांतेतत नक्की आरक्षण घेऊन परत येतील, असा विश्वास मनोज जरांगे यांची मुलगी पल्लवी जरांगे हीने व्यक्त केला. 


मराठे शांततेत गेलेत आणि शांततेतच परत येतील - शिवराज जरांगे (मुलगा)


सरकारमुळे पुन्हा उपोषणाला बसायची वेळ येते. सरकारकडे अजूनही वेळ आहे. मराठे शांततेत गेलेत आणि शांततेतच परत आरक्षण घेऊन परत येतील, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांचा मुलगा शिवराज जरांगे याने दिली. 


मुंबईत मराठ्यांंचं वादळ धडकणार 


मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या दिशेने कूच करायचा निर्णय घेतल्यानंतर लाखो मराठा बांधवांनी या आंदोलनात सहभाग घेतला. पुण्यात झालेल्या तुफान गर्दीनंतर आता हे आंदोलन मुंबईच्या वेशीवर धडकणार आहे. तसेच प्रजासत्ताक दिनी हे वादळ मुंबईत धडकणार आहे. 


हेही वाचा : 


सरकार आकडता हात घेणार नाही, सरकार तुमचंच,आंदोलनाची गरज नाही, मनोज जरांगेंसह मराठा समाजाला मुख्यमंत्र्यांचे आवाहन