Rajesh Tope On Ajit Pawar : राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडतांना पाहायला मिळत असून, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) हे भाजपसोबत (BJP) जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. तर अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या 40 आमदारांच्या स्वाक्षरी देखील घेतल्या असल्याचं वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलं आहे. दरम्यान यावरून आता अनेक राजकीय प्रतिक्रिया येत असून, माजी आरोग्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे आमदार राजेश टोपे (Rajesh Tope) यांची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे. वर बसून व्यवस्थित सर्वकाही ठरतंय, अशी प्रतिक्रिया राजेश टोपे यांनी दिली आहे. 


अजित पवारांबद्दल अनेक चर्चा सुरु असून अजितदादा भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा असल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना राजेश टोपे म्हणाले की, पक्षाच्या संदर्भात जे काही निर्णय असतात ते पक्ष श्रेष्ठींकडून घेतले जातात. राष्ट्रवादी पक्षाच्या बाबतीत शरद पवार, अजित पवार असे सर्व एकत्र बसून ठरवत असतात. त्यांनी घेतलेल्या सर्व निर्णयाची आम्ही अंमलबजावणी करत असतो. आमचा पक्ष एकसंघ असून, एकसंघच राहील याबाबत काही अडचण नाही.  वर बसून व्यवस्थित सर्वकाही ठरत आहे. 


तर आम्ही सत्तेतून बाहेर पडू, शिवसेना आक्रमक 


अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा सुरु असतानाच शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषेदतून शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे.  राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे राष्ट्रवादी सोडून भाजप किंवा शिवसेनेत आलेत तर त्यांचं आम्ही स्वागत करतो. परंतु, अजितदादा हे राष्ट्रवादीचा गट घेऊन ते भाजपसोबत जाणार असतील तर आम्ही सत्तेतून बाहेर पडू," असा इशारा आमदार संजय शिरसाट यांनी दिला. त्यामुळे आता आगामी काळात अजित पवारांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. 


चर्चा फक्त अजित पवारांचीच...


राज्याच्या राजकारणात सध्या फक्त आणि फक्त अजित पवार यांचीच सर्वाधिक चर्चा सुरु आहे. अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा जोर धरत आहे. सोमवारी अजित पवारांनी पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द केल्याची चर्चा झाली. त्यानंतर आता अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या चाळीस आमदारांच्या स्वाक्षऱ्या घेऊन ठेवल्या असल्याच्या चर्चा सुरु आहे. विशेष म्हणजे भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेकडून अजित पवार आमच्यासोबत आल्यास त्यांचे स्वागतच असल्याचे वक्तव्य करण्यात येत आहे. त्यामुळे सद्या राज्याच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणात अजित पवारांची चर्चा होत आहे. त्यामुळे आगामी काळात नेमकं काय घडते हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Dhananjay Munde : राष्ट्रवादीत All is well? धनंजय मुंडे म्हणतात Perfectly well