Corona Scam In Jalna: कोरोना काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांविरोधात झालेल्या दंडात्मक कारवाई मधून वसूल करण्यात आलेल्या रक्कमेत लाखोंचा घोटाळा झाल्याचं समोर येतंय. दंड वसुलीसाठी कोरोना पथकाकडे दिलेले पावती पुस्तके (बुक) आणि त्याची रक्कम अद्याप पालिकेत जमाच झाली नाही. शिवाय काही बिल बुक बनावट असल्याची देखील माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे हा सर्व घोटाळा आरोग्यमंत्र्यांचा जालना जिल्ह्यात झाला आहे. 


कोरोना काळात विना मास्क तसेच जमावबंदी आदेश झुगारून फिरणाऱ्या नागरिकांविरोधात सरकारमान्य दंड वसुलीचा घोटाळा जालना नगर पालिकेत उघडकीस आलाय. 15 जुलै 2020 पासून ते 28 जानेवारी 2022 पर्यत कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांकडून दंड वसुली करण्यात आली होती. मात्र या वसुलीत अनेक घोळ असून यात लाखो रुपयांची अनियमितता असल्याच माहिती अधिकारात समोर आलंय. सामाजिक कार्यकर्ते साद बिन मुबारक यांनी मागवलेल्या माहिती मध्ये पालिकेने कोरोना काळात एकूण प्रत्येकी 100 पावत्या असलेले 395 पावती बुक दंड करण्यासाठी वापरल्याच माहिती अधिकारात सांगीतलय. मात्र दीड वर्ष उलटून देखील यातील 198 बुक आणि त्यातुन वसूल केलेली रक्कम अजूनही पालिकेच्या खात्यात जमाच झालीच नसल्याच समोर आलंय.


पैसा गेला कुठं ?


पालिकेने नगर पालिकेच्या पथकबरोबर पोलीस आणि शिक्षकांच्या पथकाला देखील या पावती पुस्तकांचे वाटप केले होते. ज्यात पोलीस उअधीक्षक कार्यालयाकडे 125 पावती बुक देण्यात आले होते. मात्र या वसुली पथकाकडून दीड वर्ष उलटून सुद्धा हे पावती पुस्तक जमाच झाले नसल्याच समोर आलंय. पालिकेने कोरोना दंड वसुली साठी वापरलेले 395 पावती पुस्तकांपैकी केवळ 197 पावती पुस्तकांची माहिती अधिकारात डिटेल्स दिली आहे. त्याची एकूण रक्कम 24 लाख 47 हजार 490 एवढीय, ज्यातून आजवर 18 लाख 30 हजार एवढी रक्कम पालिकेच्या खात्यात जमा झालीय. यातील एका पावती बुकमध्ये कमित कमी 10 हजरांची वसुली झाली असून जास्तीत जास्त 81 हजार 600 रुपयांची वसुली झालीय. मात्र अद्याप 198 पावती पुस्तक पालिकेकडे आलेच नाहीत आणि त्यातून जमा झालेले पैसा कुठय असा प्रश्न तक्रारदाराने उपस्थित केला आहे. 


चौकशी होणार का? 


कोरोनाच्या भयंकर परिस्थितीमध्ये जग हतबल झालं होतं. महामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने सर्वोत्तपरी प्रयत्न केले. सक्ती केली नियमही केले आणि हे नियम न पाळणाऱ्यांना आळा बसावा म्हणून कायदेशीर कारवाई आणि दंड लावला. पण एवढ्या भयंकर स्थितीत लोकांकडून वसूल केलेला पैसा सरकार दप्तरी जमा न होता कोणाच्या खिशात गेला..? आणि एवढे दिवस पालिकेचे प्रशासन गप्प का राहिले..? शिवाय हा प्रकार फक्त जालना नगरपालिकेतच झालाय का.?? या सर्व प्रश्नांची उत्तर जनतेला मिळणे आवश्यक आहे.