जालना :  मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण देऊ नयेत, या मागणीसाठी आज जालन्यातील (Jalna) अंबड तालुक्यात भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेसाठी मराठवाड्यासह राज्यभरातील ओबीसी बांधव हजर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सभेची गर्दी लक्षात घेता आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होणार नाही, यासाठी पोलिसांकडून वाहतुकीत बदल करण्यात आले आहे. ओबीसी सभेच्या (OBC Sabha) अनुषंगाने पाच प्रमुख  मार्गांवर बदल करण्यात आले असून, राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीस पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत. 


पाच प्रमुख मार्गांवर बदल



  • शहागड - अंबडमार्गे जालन्याकडे येणारी वाहतूक वडीगोद्री समोरील उड्डाणपूल, शहागड, पाचोड - किनगाव चौफुलीमार्गे जालन्याकडे जाणार.

  • जालना- अंबडमार्गे शहागडकडे येणारी वाहतूक जालना - गोलापांगरी - पारनेर फाटा, किनगाव चौफुली-जामखेड फाटा मार्गे पाचोड- वडीगोद्री - शहागडकडे जाईल. घनसावंगी- अंबडमार्गे जालन्याकडे येणारी वाहतूक सूतगिरणी चौफुलीमार्गे राणी उंचेगाव- जालनाकडे जाईल.

  • पाचोड - अंबडमार्गे जालन्याकडे येणारी वाहतूक जामखेड फाटा - किनगाव चौफुलीमार्गे जालन्याकडे येईल.

  • पाचोड - अंबड घनसावंगी जाणारी वाहतूक पाचोड - वडीगोद्री-शहागड - तीर्थपुरीमार्गे घनसावंगीकडे जाणार आहे.

  • ही वाहतूक 17 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 वाजेपासून ते रात्री 7 वाजेपर्यंत अथवा जनसमुदाय जाईपर्यंत राहणार आहे.


पोलिसांकडून तगडा बंदोबस्त... 


अंबड येथील सभेच्या पार्श्वभूमीवर जालना पोलिसांकडून तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. यासाठी, स्थानिक पोलिसांसह इतर जिल्ह्यातून देखील पोलिसांचा बंदोबस्त मागवण्यात आला आहे. सभेसाठी येणाऱ्या प्रमुख मार्गांवर पोलिसांचा बंदोबस्त असेल, तसेच सभेच्या ठिकाणी देखील पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी मराठा आंदोलनाच्या वेळी जालना शहरात झालेल्या हिंसाचाराच्या घटना पाहता, पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे. 


सरसकट मराठा आरक्षणाला विरोध... 


महाराष्ट्रातील सर्वच मराठ्यांना ओबीसीमधून सरसकट आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. मात्र, त्यांच्या याच मागणीला ओबीसी नेत्यांनी विरोध केला आहे. तर, हाच विरोध दर्शवण्यासाठी आज अंबडमध्ये ओबीसींची जाहीर सभा होत आहे. या सभेला राज्यातील प्रमुख ओबीसी नेते हजर राहणार आहेत. तसेच, आपल्या भाषणातून सरसकट मराठा आरक्षणाला या ओबीसी नेत्यांकडून विरोध होण्याची शक्यता आहे. 


सभेला 'या' नेत्यांची उपस्थिती?


सभेला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde), विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar), महादेव जानकर (Mahadev Jankar), गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar), शिवाजीराव चोथे (Shivajirao Chothe) यासह ओबीसी नेते प्रकाश शेंडगे (Prakash Shendge) आदींची उपस्थितीत असणार आहे.



इतर महत्वाच्या बातम्या: 


मोठी बातमी! ओबीसी सभेच्या पार्श्वभूमीवर जालन्यात 'जमाव बंदी'चे आदेश; पाचपेक्षा अधिक लोकांना जमण्यास मनाई