जालना : देवा तुला शोधू कुठे असं म्हणायची वेळ सध्या जालन्यातील (Jalna News)  जांब-समर्थमधील ग्रामस्थांवर आली आहे. स्वतः समर्थ रामदास (Samarth Ramdas) ज्या मूर्तींची पूजा करायचे त्याच प्राचीन मूर्ती काल पहाटे चोरीला गेल्या. मात्र 36 तास उलटून गेलेत आणि अजूनही ना चोरांचा ठावठिकाणा... ना मूर्तींचा पत्ता.... मूर्ती चोरीला गेल्यानं पहिल्यांदाच श्रीराम मंदिरात सकाळी सात वाजता होणारी आरती झाली नाही. जालना जिल्ह्यातील समर्थांच्या श्रीराम मंदिरातील मूर्ती चोरीला जवळपास 36 तास उलटलीत, मात्र अजूनही पोलिसांच्या हाती काही धागेदोरे आढळले नाहीत.  मूर्ती चोरीचा निषेध करण्यासाठी ग्रामस्थांनी अन्नत्याग करण्याचा इशारा दिला आहे.


चोरीची घटना आणि घटनास्थळाचा मागोवा घेतला तर चोरीचा प्रकार चक्रावून टाकणारा आहे.  या घटनेत सभ्य चोरांनी मंदिराच्या गाभाऱ्याचा दरवाजा काही फूट अंतरावर असलेल्या खांबावर लटकवलेली चावी घेऊन कुलूप काढून मूर्तीसह पोबारा केला आहे. विशेष म्हणजे चोरांनी ती चावी पुन्हा मूळ जागी पुन्हा तशीच ठेवली.  त्यामुळे मंदिर परिसरातील जाणकार चोराने हा डाव साधल्याची शंका आहे. मात्र स्थानिक पोलिसांना याचेही काही धागे दोरे अजून  मिळाले नाहीत. 


चोरीच्या या घटनेत मंदिराच्या दरवाजाबाहेर असलेल्या दोन दानपेट्या देखील सुरक्षित आहेत. त्यामुळे चोरांचा रस पैशापेक्षा मौल्यवान मूर्तीमध्ये होता का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. चोरीच्या या घटनेत चोरांनी देवाशिवाय समर्थ वापरत असलेली घागर, एक समर्थांची पितळी मूर्ती, आणि चार मोठ्या जुन्या समया का सोडल्या हा देखील प्रश्न आहे.  दुसरीकडे ग्रामस्थ भाविक नित्य दर्शनासाठी येताना गाभाऱ्यात राम नसल्याने निराश होऊन जाऊ नये म्हणून चोरीला गेलेल्या मूर्तीच्या जागी मंदिर विश्वस्तांनी राम लक्ष्मण सीतेची प्रतिमा ठेवली आहे. मंदिरात ठेवलेली प्रतिमा भाविकांना काही क्षण आधार वाटते.  त्यामुळे कासव गतीचा तपास लोकांच्या आणि भक्त भाविकांच्या उद्रेकाचे कारण ठरू नये एवढंच सरकार आणि प्रशासनाकडून अपेक्षीत आहे.