Jalna Idol Theft Case : जालना (Jalna) इथे समर्थ रामदास यांचं (Samarth Ramdas) जन्मस्थान असलेल्या जांब समर्थ गावात, श्रीराम मंदिरातील काल (22 ऑगस्ट) झालेल्या मूर्ती चोरीच्या घटनेनंतर गावावर अक्षरशः शोककळा पसरली आहे. समर्थांच्या देवघरातील श्रीराम मंदिरातल्या राम, सीता, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न तसंच हनुमानाच्या मूर्ती चोरीला गेल्याने आज (23 ऑगस्ट) पहिल्यांदा श्रीराम मंदिरात आरती झालेली नाही. मंदिरात दररोज सकाळी 7 आणि संध्याकाळी 7 वाजता आरती होते. परंतु आज सकाळची आरती झाली नाही. तर संध्याकाळचीही आरती होऊ शकणार नाही. मंदिरात देवच नसतील तर कोणाची आरती, असा प्रश्न भाविक आणि ग्रामस्थ विचारत आहेत.


देवच चोरीला गेल्यानंतर ज्या गावकऱ्यांची सुरुवात श्रीरामाच्या दर्शनाने होते त्यासाठी आज गावकरी मुकले. दरम्यान मूर्ती चोरीमुळे गावकरी आणि भाविक शोकसागरात आहे. मूर्ती चोरीचा निषेध म्हणून गावकरी उद्या (24 ऑगस्ट) एक दिवस अन्नत्याग करण्याच्या तयारीत आहेत.


दुर्मिळ आणि ऐतिहासिक मूर्तींची चोरी
घनसावंगी तालुक्यातील जांब समर्थ गावात  450 वर्षांपूर्वीच्या दुर्मिळ आणि ऐतिहासिक मूर्तींची चोरी झाली. समर्थांच्या देवघरातील त्यांचा स्पर्श झालेल्या राम सीतेच्या मूर्ती चोरीला गेल्या. समर्थांचं जन्मस्थान म्हणून जांब समर्थ गाव प्रसिद्ध आहे. परंतु या मंदिरातील ऐतिहासिक ठेवा आणि धार्मिक अधिष्ठान असलेल्या समर्थांच्या देवघरातील राम मंदिरातील देवच चोरांनी चोरुन नेले. या मंदिराचे पुजारी नियमितपणे काल सकाळी पूजेसाठी आले असता त्यांना धक्काच बसला.  पूजा करत असलेल्या तसंच त्यांचे वडिलोपार्जित देवघरातील अनेक मूर्ती गाभाऱ्यातून गायब झालेल्या दिसल्या आणि ही चोरीची घटना उघड झाली.


पोलिसांच्या माहितीनुसार चोरांनी अंदाजे पहाटे दोन ते तीनच्या सुमारास ही चोरी केली असावी. चोरीचा प्रकार देखील चक्रावून सोडणारा आहे. चोरांनी चोरी करताना जवळच एका खांबावर अडकवलेली चावी घेतली. त्या चावीने कुलूप उघडून गाभाऱ्यात प्रवेश केला, ज्यात त्यांनी मौल्यवान अशा पंचधातूंच्या मूर्ती घेऊन पोबारा केला. विशेष म्हणजे, जाताना चावी पुन्हा त्याच जाग्यावर नेऊन ठेवली.


समर्थ रामदासांच्या जन्मगावातील राम मंदिरातून ऐतिहासिक मूर्ती चोरीला, 450 वर्षांपूर्वीच्या मूर्ती चोरीला, विधानसभेत पडसाद


कोणकोणत्या मूर्ती चोरीला गेल्या?


1) 'श्रीराम पंचायतन' मूर्ती चोरीला गेली. राम ,लक्ष्मण, सीता, भरत ,शत्रूघ्न अशा एकत्रित मूर्ती असलेले पंचधातूचे पंचायतन चोरीला गेले. साक्षात सूर्यनारायणाने समर्थांचे वडील सूर्याजी पंत यांना हे पंचायतन दिल्याची आख्यायिका सांगितली जाते.


2) दुसरी मूर्ती श्रीराम ,सीता आणि लक्ष्मण यांची एकत्रित असलेली स्वतः समर्थांनी स्थापित केलेली मूर्ती होती. स्वतः समर्थांच्या देवघरात ते या मूर्तीची पूजा करत असत. साधारण 30 किलो वजनाची ही पंचधातूची मूर्ती आहे.


3) पंचधातूच्या हनुमानाच्या दोन मूर्ती. दीड ते दोन फूट उंचीच्या आणि दहा किलो वजनाच्या या मूर्ती.


4) भिक्षेच्या वेळी समर्थ बाळगत असलेल्या पंचधातूची पाच इंचाची हनुमानाची मूर्ती.


5) राम-लक्ष्मण-सीतेसमोर ठेवलेली जमुवंतची पंचधातूंची मूर्ती.


गृहमंत्र्यांकडून सखोल तपासाचे आदेश
पोलिसांनी या प्रकरणांमध्ये काल सकाळपासूनच तपासणी सुरु केली. पोलीस अधीक्षकांनी या ठिकाणी भेट देऊन चोरांचा शोध घेण्यासाठी पाच पथक स्थापन करुन ती शोधासाठी रवाना केली आहेत. दरम्यान सभागृहात देखील माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर गृहमंत्र्यांनी या प्रकरणाची सखोल तपास करण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस या प्रकरणाची सर्व बाजूने चौकशी करत असून एवढ्या सभ्यपणे साक्षात देवांची चोरी करणाऱ्या चोरांचा शोध घेत आहेत.


Jalna Crime : Samarth Ramdas यांच्या जन्मगावातील राम मंदिरातून ऐतिहासिक मूर्ती चोरीला ABP Majha