Jalna: एकीकडे पूरस्थितीने संपूर्ण गावाचा संपर्क तुटलेला आणि दुसरीकडे आजारी आईला रुग्णालयात नेण्याची तगमग… अशा कठीण प्रसंगी जालन्यातील एका तरुणाने जे धाडस केलं, ते खरोखरच ‘आधुनिक श्रावणबाळ’ म्हणावे असंच! जालना जिल्ह्यातील परतुर तालुक्यातील सावरगाव बुद्रुक येथे घडलेला हा प्रसंग सध्या संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेत आहे. जालन्यातील सावरगाव बुद्रूक गावातील गौतमी नदीला मुसळधार पावसानंतर पूर आला. या नदीवर सध्या पूलाचे काम सुरू असल्याने गावासाठी पर्यायी रस्ता तयार करण्यात आला होता. मात्र, कालच्या जोरदार पावसानं तो रस्ताही पूर्णपणे वाहून गेला. त्यामुळे सावरगाव बुद्रुक गावाचा बाजारपेठेशी आणि शहराशी संपर्क पूर्णतः तुटला.

दरम्यान, गावातील या तरुणाच्या आईला दवाखान्यात न्यावं लागणार होतं.आईची प्रकृती तोळामासा. त्यात पुलही वाहून गेला अन् पर्यायी रस्ताच उपलब्ध नसल्याने त्या तरुणाने आईला पाठीवर उचलून नदी ओलांडण्याचा निर्णय घेतला. पुराच्या पाण्यात त्याने आईला पाठीवर घेतलं. पुराच्या प्रवाहाची धास्ती त्यात कधी पाय सटकायचा धोका, पाण्याचा जोर वाढण्याची भीती. पण तरुणानं पाठीवर आईला घेतलं आणि नदी ओलांडली.

पूराच्या पाण्यानं वेढलं, आईला दवाखान्यात नेण्यासाठी पाठीवर घेतलं

सावरगाव बुद्रुक गावातून आष्टीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पुलाचे काम सुरू आहे. पुलाचे काम सुरू असल्याने पर्यायी रस्ता होता मात्र कालच्या पावसाने पर्यायी रस्ता वाहून गेला आहे.  फक्त हीच नाही तर गावातील अनेक भाजी विक्रेतेही आपल्या व्यवसायासाठी जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यातून प्रवास करत असल्याचं पाहायला मिळालं. दररोजच्या गरजांसाठी गावकऱ्यांना धोकादायक मार्ग अवलंबावा लागत आहे. या परिस्थितीमुळे ग्रामस्थांमध्ये संताप आणि चिंता व्यक्त केली जात आहे. अनेकांनी प्रशासनाकडे लवकरात लवकर पुलाचे काम पूर्ण करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा

एसटी अन् दुचाकीचा भीषण अपघात, 2 जण ठार; भरधाव बसने दुचाकीला फरफटत नेलं