जालना: ज्या वर्गात मुलांना शिकवलं त्याच वर्गात एका शिक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या (Jalna Teacher Suicide) केल्याची घटना जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात घडली. मठ तांडा येथे 50 वर्षीय शिक्षकाने शाळेतच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. केराप्पा घोडके असं मयत शिक्षकाचे नाव असून मठ तांडा येथील जिल्हा परिषद शाळेतच लोखंडी अँगलला फास लावून त्यांनी आत्महत्या केली. मंगळवारी दुपारी 2 वाजता हा प्रकार उघडकीस आला.


आत्महत्या केलेले शिक्षक केराप्पा घोडके हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील रहिवाशी आहेत. आत्महत्या करताना त्यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. ती नोट पोलिसांच्या हाती लागली असून त्यावरून आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. केराप्पा घोडके हे शांत स्वभावाचे आणि मुलांच्या आवडीचे शिक्षक असल्याने त्यांच्या आत्महत्येनंतर विद्यार्थी तसेच पालकांतूनही दुःख व्यक्त होत आहे.


काय लिहिलंय सुसाईड नोटमध्ये? (Jalna Teacher Suicide Note)


सदर आत्महत्या केलेल्या शिक्षकांच्या खिशात एक चिठ्ठी आढळून आली असून या चिठ्ठीमध्ये 'माझ्या मृत्यू ला कोणालाही जबाबदार धरू नये, बाळा, भैय्या, आरती तुम्हा तिघांना माझ्यामुळे आर्थिक, सामाजिक आणि मानसिक त्रास झाला. त्याबद्दल मला माफ करा. आई तुझे उपकार मी फेडू शकलो नाही मला माफ कर. माझ्या कुटुंबाला त्रास देणाऱ्याला सोडू नका' असे नमुद केले आहे. 


केरप्पा दिगंबर घोडके हे मागील एक वर्षापासून मठ तांडा येथील जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. मठ तांडा येथे इयत्ता चौथी पर्यंत शाळा आहे. घोडके हे आज एकटेच शाळेवर कार्यरत होते. दुपारी मध्यान्ह भोजनच्या सुट्टीमध्ये सर्व विद्यार्थी वर्गाच्या बाहेर गेल्यानंतर घोडके यांनी हे पाऊल उचल्याचं सांगण्यात येत आहे.


घटनेची माहिती मिळताच गोंदी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आर.पी. ठाकरे, एम.गायकवाड, जी.मुढे, एन परासे यांनी घटनास्थळी धाव घेत सदर घटनेचा पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवच्छेदन करण्यासाठी अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. घोडके सर हे अत्यंत मनमिळाऊ आणि शांत स्वभावाचे होते, ते सर्व विद्यार्थ्यांचे लाडके शिक्षक होते. त्यांच्या या निर्णयामुळे सर्व विद्यार्थी आणि पालक वर्गातून हळहळ व्यक्त होत आहे.


ही बातमी वाचा :