जालना : जिल्ह्यातील कोतवाल भरती परीक्षेत (Kotwal Recruitment Exam) आधुनिक तंत्रज्ञानाव्दारे कॉपी करण्यात येत असल्याचा प्रकार शनिवारी समोर आला होता. दरम्यान, या प्रकरणात एकूण सात जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील म्होरक्या फरार असल्याची माहीती समोर आली असून, त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. विशेष म्हणजे, परीक्षा केंद्रातून ताब्यात घेण्यात आलेल्या पाच जणांनी अंतर्वस्त्रामध्ये पॉकेट तयार करून मोबाईल डिव्हाइस आतमध्ये नेल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. तर, त्यांना परीक्षा केंद्राच्या बाहेरून उत्तरे पुरविणाऱ्या दोन जणांना जालना गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.
जालना जिल्हाधिकाच्यांकडून जिल्ह्यातील तहसिल कार्यालयातील कोतवालपदाची परीक्षा शनिवारी नियोजित करण्यात आली होती.ही परीक्षा शहरातील तीन परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली होती. मात्र, शहरातील राष्ट्रमाता इंदिरा गांधी या महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर मोबाईल व इतर डिव्हाईस इलेक्ट्रॉनिक माध्यमातून गैरप्रकार होणार असल्याची माहीती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सापळा लावत परीक्षा केंद्राच्या बाहेरून दोन संशयीतांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून मोबाईल डिव्हाईस अशा संशयित वस्तू मिळून आल्या. त्यामुळे त्यांची अधिक विचारपूस केली असता, परीक्षा केंद्रामधील परीक्षार्थीनी फोटो काढून आम्हास पाठविलेले असून मोबाईल डिव्हाईसद्वारे आम्ही त्यांना प्रश्नांची उत्तरे पाठवत असल्याची त्यांनी कबुली दिली.
ब्लूटूथ डिव्हाइस, मोबाईल, एअरफोन, वेगवेगळे सिमकार्ड जप्त...
त्यानुसार पोलिसांनी परीक्षा केंद्रातून पेपरचे फोटो पाठवणाऱ्यांना ताब्यात घेतले. ज्यात परीक्षा केंद्रात गैरप्रकार करणारे परीक्षार्थी व प्रश्नांची उत्तरे पुरवणाऱ्या पाच मुलांचा यात समावेश आहे. त्यांचे ताब्यातून ब्लूटूथ डिव्हाइस, मोबाईल, एअरफोन, वेगवेगळे सिमकार्ड असे साहित्य जप्त करण्यात आले. यावेळी संशयिताकडून वाहनांसह 9 लाख 11 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. विशेष म्हणजे, परीक्षा केंद्रातून ताब्यात घेण्यात आलेल्या पाच जणांनी अंतर्वस्त्रामध्ये पॉकेट तयार करून मोबाईल डिव्हाइस आतमध्ये नेले होते. या प्रकरणातील म्होरक्या फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणी अव्वल कारकुन योगेश बाळकृष्ण वानखेडे यांच्या फिर्यादीवरुन कदीम जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आतापर्यंत ताब्यात घेण्यात आलेले आरोपी...
परीक्षार्थी ईश्वर परमेश्वर कवडे (रा. पीरवाडी ता. जालना), गजानन रतन जगरवाल (रा. खडकवाडी ता. बदनापूर जि. जालना, राजेंद्र महासिंग सुंदर्डे (रा. राजेवाडी ता. बदनापूर, जि. जालना) अनिल देवचंद सुलाने (डावरगाव ता. बदनापूर) या प्रशिक्षणार्थीना उत्तरे पुरविणारा आकाश इंदलसिंग पहुरे (रा. पीरवाडी, ता. बदनापूर) यास ताब्यात घेतले.
इतर महत्वाच्या बातम्या: