जालना : जिल्ह्यातील धनगर समाज पुन्हा एकदा आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे. अंबड तालुक्यातील धुळे-सोलापूर महामार्गावरती धनगर समाजाच्या वतीने शनिवारी रात्रीच्या सुमारास टायर जाळून आंदोलन करण्यात आले. जामखेड फाटा येथे या आंदोलकांनी टायर पेटवले होते. आमदार तथा धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्यावर इंदापूर येथे झालेल्या चप्पलफेक प्रकरणी आक्रमक झालेल्या धनगर समाजाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.
गोपीचंद पडळकर यांच्यावर करण्यात आलेल्या चप्पलफेक प्रकरणी राज्यभरात धनगर समाज आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे. याचेच पडसाद जालन्यात देखील उमटताना पाहायला मिळाले. रात्री साडेदहा ते अकराच्या सुमारास जामखेड फाटा येथील धुळे-सोलापूर महामार्गावरती धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला. यावेळी आंदोलकांनी महामार्गावरच टायर पेटवून दिली. त्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. याबाबत माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी रस्ता मोकळा केला.
इंदापुरात नेमकं काय घडलं?
पुणे जिल्ह्यातील इंदापुरात शनिवारी ओबीसी एल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात गोपीचंद पडळकर यांच्यासह अनेक ओबीसी नेते उपस्थित होते. मात्र, ओबीसी मेळावा संपल्यानंतर सभेपासून काही अंतरावर राड्याचं स्वरुप पाहायला मिळालं. यावेळी गोपीचंद पडळकर यांच्यावर चप्पलफेक देखील करण्यात आली. ही चप्पलफेक मराठा आंदोलकांनी केलीये असा आरोप ओबीसी आंदोलकांकडून करण्यात आला आहे. तर, मराठा आंदोलकांनी आम्ही ही चप्पलफेक केली नसल्याचं म्हटले आहे. मात्र, यावरून राज्यभरातील धनगर समाज आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे.
पडळकरांची प्रतिक्रिया...
दरम्यान, आता या सर्व प्रकरणावर गोपीचंद पडळकर यांची देखील प्रतिक्रिया आली आहे. "ओबीसी समाज अत्यंत सयंमाने शांततेत ओबीसी एल्गार मेळ्याव्यामंधे आपल्या स्वतःच्या हक्काच्या आरक्षणाबाबत भूमिका मांडतोय. काल इंदापूरची सभा संपल्यानंतर शेतकऱ्यांना दुधाचे दर मिळाले पाहिजेत या सुरु असलेल्या आंदोलनास मी जात असताना नौटंकीचा हा प्रकार घडला. त्यानंतर या भेकडांनी परत नौटंकीबाज करत मिडीयात मुलाखती दिल्या आणि म्हणतात सदर घटना माझ्याच कार्यकर्त्यांनी केली. खरोखर मला यांची कीव वाटते. मुळात आम्ही नेहमीच आमची भूमिका स्पष्ट केली आहे की गरीब मराठा समाजला आरक्षण मिळालेच पाहिजे. पण, मराठा आरक्षणाच्या लढाईत घुसलेल्या समाजकंटक कधी कोणाची घरं जाळतात तर कधी कुणाला फोन करून शिव्या देतात. यावरून हेच स्पष्ट होते की समाजकंटकांचा हेतू आरक्षण मिळवणे नसून समाजात अशांतता पसरवणे आहे," असं पडळकर म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या: