Dhangar Reservation Protest : धनगर आरक्षणाच्या (Dhangar Reservation) मागणीसाठी काढण्यात आलेल्या मोर्च्याला जालन्यात (Jalna) हिंसक वळण लागल्याचे मंगळवारी पाहायला मिळाले. यावेळी संतप्त झालेल्या मोर्चेकरी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक करत तोडफोड केली होती. दरम्यान, आता या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक करण्यासह शासकीय व खाजगी वाहनांचे नुकसान केल्या प्रकरणी तालुका पोलिसांनी 15 संशयितांना ताब्यात घेतले आहे. तसेच, शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्या प्रकरणी 100 ते 150 जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर मंगळवारी काढण्यात आलेल्या धनगर समाजाच्या मोर्चास हिंसक वळण लागले होते. निवेदन स्वीकारण्याच्या कारणावरून मोर्चात सहभागी काही तरुणांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक केली. यावेळी, तिथे असलेल्या शासकीय व खाजगी वाहनांचे नुकसान करण्यात आले. या प्रकरणी आता पोलिसांकडून कारवाईला सुरवात झाली आहे. या प्रकरणी तालुका पोलिसांनी 15 संशयितांना ताब्यात घेतले आहे. सोबतच, या प्रकरणी 100 ते 150 जणांविरुध्द तालुका ठाण्यात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
धनगर समाजाला अनुसूचित जमाती आरक्षणाच्या अंमलबजावणी करण्यासह अन्य प्रमुख मागण्यांसाठी सकल धनगर समाजाच्या वतीने मंगळवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. दरम्यान, मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकताच काही नेत्यांचे भाषण सुरु झाले. त्यानंतर, जिल्हाधिकारी यांनी निवेदन स्वीकारायला कार्यालयातून खाली येण्याची मागणी काही मोर्चेकरी यांनी केली. पण, जिल्हाधिकारी निवेदन स्वीकारण्यास न येता, इतर अधिकाऱ्यांना त्यांनी पाठवल्याने काही मोर्चेकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे, काही मोर्चेकऱ्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी गोंधळ उडाल्याने दगडफेकीसह जिल्हाधिकारी कार्यालयाच्या काचा फोडण्यासह शासकीय व खाजगी वाहनांचे नुकसान करण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत जमावाला पांगविले. दरम्यान, या घटनेनंतर काही वेळ तणाव निर्माण झाला होता.
गैरसमजुतीतून घटना घडली...
दरम्यान यावर प्रतिक्रिया देतांना जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ म्हणाले की, जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर धनगर बांधवांचा मोर्चा आला होता. त्यांचे निवेदन स्वीकारण्यासाठी मी पूर्णवेळ कार्यालयात उपस्थित होतो. मात्र, मोर्चेकऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार तीन वरिष्ठ अधिकारी निवेदन स्वीकारण्यासाठी जाता असतानाच काही जमाव हिंसक झाला. जमावाला पाहून अधिकारी परत आले. पण, प्रशासन आपली दखल घेत नसल्याचा गैरसमज झाला आणि त्यातून आंदोलनाला हिंसक वळण लागले. प्रशासनाने या आंदोलनाची पूर्णपणे दखल घेतली होती, तसेच एक दिवस आधीपासून शिष्टमंडळासोबत चर्चा देखील सुरु होती. असे जिल्हाधिकारी पांचाळ यांनी म्हटले आहे.
संबंधित बातम्या: