जालना: धनगर समाजाचे आंदोलन (Dhangar Reservation Protest) हे आपल्याला शांततेच्या मार्गाने करायचे आहे, हिंसक मार्गाने नाही असं सांगत भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी (Gopichand Padalkar) समाजाला शांततेचं आवाहन केलं आहे. तसेच प्रशासनाने जोरजबरदस्तीने केसेस दाखल करू नयेत असं आवाहनही त्यांनी केलं. जालन्यात धनगर मोर्चाला हिंसक वळण लागलं, निवेदन स्वीकारण्यासाठी जिल्हाधिकारी न आल्याने आंदोलकांकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक आणि तोडफोड करण्यात आली. त्यानंतर आमदार गोपीचंद पडळकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. 


आज राज्यभर जिल्ह्याचे जिल्ह्याधिकारी आणि तहसीलदार यांना निवेदन देण्याचा कार्यक्रम राज्यभर झाला. संपूर्ण कार्यक्रम शांततेत झाला. सोमवारी जालना येथील जिल्हाधिकारी यांनी निवेदन घेण्यासाठी खाली येईन असे सांगितले होते. मात्र आज एक तास वाट बघून देखील ते निवेदन घ्यायला आले नाही, त्यामुळे तोडफोड झालीय. प्रशासकीय अधिकारी ऐकत नाहीत. मी धनगर समाजाला सांगेन आपल्याला हे आंदोलन शांततेत घेऊन जायचे आहे. आपण सर्वांनी शांततेत आंदोलन करावे. 


प्रशासनाने जबरदस्तीने केसेस दाखल करू नयेत


आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, जालना प्रशासनाला सांगणे आहे जोर जबरदस्ती करून केसेस दाखल करू नये. पोलीस अधीक्षक यांच्याशी मी फोनवर बोलून चुकीची कारवाई होऊ नये असे सांगणार आहे. वेळ पडली तर मी जालन्याला जाईन. सरकारने आता यावर लवकर मार्ग काढला पाहिजे. सरकार यातून मार्ग काढेल असा आम्हाला विश्वास आहे. सरकारने तात्काळ कार्यवाही करावे. 


धनगर समाज आंदोलनाचा विषय पूर्णपणे वेगळा आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजवणीची मागणी आहे. आम्ही नव्याने कुठे आरक्षण मागत नाही असं आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले. मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत देवेंद्र फडणवीस यांनी वेगळं आरक्षण दिले होते, तशी प्रक्रिया सरकार लवकर सुरू करेल असे मुख्यमंत्री यांनी सांगितलं अशी माहिती पडळकरांनी दिली. 


जालन्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक


जालन्यात धनगर समाज आक्रमक झाला, धनगर समाजाच्या मोर्चाला हिंसक वळण लागलं. आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक करत वाहनांची तोडफोडही केली. जिल्हाधिकारी निवेदन स्वीकारण्यासाठी खाली न आल्याने आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रमुख गेट तोडून आतमध्ये प्रवेश केला आणि तोडफोड केली.


धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीच्या आरक्षण अंमलबजावणीच्या मागणीसाठी जालना शहरात विशाल मोर्चा निघाला होता. जालना शहरातील गांधी चौकातून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. गेल्या अनेक वर्षापासून धनगर समाजाकडून अनुसूचित जमातीमध्ये समावेशाच्या अंमलबजावणीची मागणी केली जात आहे. त्यातच सरकारने दिलेल्या आश्वासनानंतर याबाबत कुठलीही हालचाल होत नाही. त्यामुळे धनगर समाज आक्रमक झाला आहे. 


ही बातमी वाचा: