Jalgaon News: तलावात पोहण्यासाठी गेलेल्या तीन शाळकरी मुलांपैकी दोघांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना गुरुवारी दीड वाजेच्या सुमारास जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील धारागिर शिवारात घडली. दोन मुलांचा जीव गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. निलेश राजेंद्र मिस्त्री (वय 17) आणि श्रावण शिवाजी पाटील (वय 15 दोन्ही रा. भोलानाथ नगर, शिरसोली) अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. तर या घटनेत जयेश जालिंदर सोनवणे हा बचावला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिरसोली येथील जयेश जालींदर सोनवणे, निलेश राजेंद्र मिस्त्री आणि श्रावण शिवाजी पाटील हे तिघे गुरूवारी दुपारी जळगाव तालुक्यातील शिरसोली गावाजवळ असलेल्या धारागिर शिवारात असलेल्या डोहात पोहण्यासाठी गेले होते. यात पाण्यात पोहतांना निलेश मिस्त्री आणि श्रावण पाटील यांना पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर जयेश सोनवणे हा थोडक्यात बचावला आहे.
दोघेजण पाण्यात बुडत असल्याचे पाहून जयेशने शिरसोली गावात धाव घेतली. त्यामुळे या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरल्यानंतर नागरीकांना तातडीने धाव घेत घटनास्थळ गाठले. गावातील विलास भिल्ल, हिरामण प्रताप भिल्ल, संदीप भिल्ल या तरूणांच्या मदतीने दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. यावेळी नागरीकांची मोठ्या संख्येने घटनास्थळी गर्दी होती. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दोघांचे मृतदेह रवाना करण्यात आले आहे. या घटनेमुळे जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मयत निलेशच्या पश्चात वडील राजेंद्र एकनाथ मिस्तरी, आई यशोदा, बहिण आरती असा परिवार आहे. निलेशचे वडील यांचे गॅरेज असून निलेश सुद्धा वडिलांना मदत व्हावी म्हणून गॅरेजवर कामाला जात होता.
दोन वर्षापूर्वी आईचे कोरोनाने निधन, आता मुलाचा मृत्यू
श्रावण यांच्या पश्चात वडील शिवाजी रामकृष्ण पाटील आणि लहान भाऊ चेतन परिवार आहे. श्रावणची आईचे दोन वर्षापूर्वी कोरोनामुळे निधन झाले. दरम्यान, या घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू होते. दोघा शाळकरी मुलांचे मृतदेह काढण्यासाठी विलास भिल, हिरामण भिल आणि संदीप भिल या तिघांनी शर्थीचे प्रयत्न केले. एमआयडीसी पोलीस स्थानकाचे कर्मचारी समाधान टाकळे, शुद्धधन ढवळे यांच्यासह शिरसोली गावाचे पोलीस पाटील श्रीकृष्ण पाटील मदत कार्य केले. दरम्यान दोन्ही मुलांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले आहे.