जळगाव : तुमच्या पाया पडतो, पण जिल्हा दूध संघातील अपहारासंबंधी गुन्हा दाखल करा अशी मागणी करत राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे शहर पोलिस ठाण्यात ठिय्या मारून बसले आहेत. आज मेलो तरी गुन्हा दाखल झाल्याशिवाय मी इथून जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे. जिल्हा दूध संघात एक ते दीड कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे. 


राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे तब्बल चार तासापासून जळगाव शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकांच्या दालनात ही आंदोलनाला बसले आहेत. जिल्हा दूध संघातील अपहर प्रकरणात गुन्हा दाखल करावा अशी त्यांची मागणी आहे. चार तास उलटूनही गुन्हा दाखल होत नसल्याने एकनाथ खडसे यांनी चक्क हात जोडून अधिकाऱ्याला उद्देशून मी तुमच्या पाया पडतो गुन्हा दाखल करा अशी विनंती केली.


जिल्हा दूध संघातील एक ते दीड कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल व्हावा या मागणीसाठी खडसे तब्बल चार तासांपासून जळगाव शहर पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षकांच्या दालनात या आंदोलनाला बसले आहे. 


राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसेंची गुन्हा दाखल करण्याची मागणी आहे. तर दुसरीकडे कायदेशीर बाबीचे कारण पुढे करत पोलिस अधिकारी त्यांची समजूत घालत आहेत. तसेच चौकशी करुन गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन देत आहेत. मात्र एकनाथ खडसे मात्र त्यांच्या मागणीवर ठाम आहेत. मी आज मेलो तरी गुन्हा दाखल केल्याशिवाय जाणार नाही असेही एकनाथ खडसे यांनी ठणकावून पोलिसांना सांगितले.


ब्लड प्रेशरचा त्रास तसेच मधुमेह असल्याने, प्रकृती लक्षात घेता पोलिस स्टेशनमध्येच डॉक्टरांना बोलावून एकनाथ खडसे यांची जागीच तपासणी करण्यात आली.


जिल्हा दूध संघातील एक ते दीड कोटींच्या अपहाराबाबत दूध संघाचे व्यवस्थापकीय संचालक आणि कर्मचारी पोलिस ठाण्यात तक्रारीसाठी फेऱ्या घालत आहेत. मात्र यानंतरही पोलिस तक्रार अथवा गुन्हा दाखल करून घेत नसल्याने आज चक्क जिल्हा दूध संघाचे संचालक तथा आमदार एकनाथ खडसे हे शहर पोलीस ठाण्यात, पोलीस निरीक्षकांच्या दालनात आंदोलनाला बसले आहेत. यावेळी खडसे यांच्यासोबत मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्तेसुद्धा उपस्थित आहेत. या अपहारातील संशयितांना फरार करण्यामध्ये पोलिसांचा हात असल्याचा तसेच इतरही अनेक गंभीर आरोप यावेळी एकनाथ खडसे यांनी पोलिस यंत्रणेवर केले आहे.


याबाबत पोलिस अधीक्षकांना विचारणा केली असता त्यांच्याकडूनही कुठल्याही समाधानकारक उत्तर मिळत नाही. पोलिसांवर राजकीय कोणाचा तरी दबाव आहे, त्यामुळे या प्रकरणात गुन्हा दाखल होत नसल्याचा आरोप आमदार एकनाथ खडसे यांनी केला आहे. 


राज्यात पोलीस यंत्रणा दबावाखाली काम करत असून त्याचाच प्रत्यय म्हणून खोटे गुन्हे दाखल करणे अशा काही गोष्टी समोर येत आहेत. जिल्ह्यात सट्टा, पत्ता तसेच अवैध धंदेही मोठ्या प्रमाणावर वाढले असून पोलिसांच्या हप्तेखोरीमुळे या गोष्टी घडत असल्याचा आरोप ही यावेळी एकनाथ खडसे यांनी केला आहे. तसेच साधा गुन्हा दाखल करण्यासाठी आमच्या सारख्या नेत्यांना यावे लागते अशी खंतही यावेळी खडसेंनी व्यक्त केली. तसेच जोपर्यंत या प्रकरणात नियमानुसार कायद्यानुसार तक्रार अथवा गुन्हा दाखल होणार नाही, तोपर्यंत मी या ठिकाणाहून उठणार नाही असा आक्रमक पवित्र एकनाथ खडसेंनी घेतला आहे.