Jalgoan News : जळगावात (Jalgoan) मकसंक्रांत सणाला गालबोट लागले असून धरणगाव तालुक्यातील हिंगोणे गावात पतंग उडवताना तोल जाऊन विहिरीत पडल्याने दहा वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी (15 जानेवारी) दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली आहे. अक्षय संजय महाजन असे मयत बालकाचे नाव असून सदर घटनेमुळे हिंगोणे गावात शोककळा पसरली आहे.
मकरसंक्रांतनिमित्त (Makar Sankranti) सर्वत्र पतंगोत्सव साजरा केला जात आहे. तथापि, यात काळजी न घेतल्यास दुर्घटना घडत असतात. अशीच एक दुर्घटना धरणगाव तालुक्यातील हिंगोणे येथे घडली. येथे मूळचे अमळनेर तालुक्यातील रहिवासी असलेले संजय महाजन (माळी) हे कुटुंब उदरनिर्वाहानिमित्त स्थायिक झालेले आहे. याच कुटुंबातील अक्षय संजय महाजन (माळी) हा बालक रविवारी दुपारी दोन वाजता पतंग उडवत होता. याप्रसंगी त्याचा तोल जाऊन तो विहिरीत पडल्याने त्याचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तो विहिरीत पडल्याचे कळताच परिसरातील ग्रामस्थांनी धाव घेऊन त्याला बाहेर काढले. मात्र तोवर त्याची प्राणज्योत मालवली होती.
उत्साह बेतला जीवावर
अक्षय माळी हा पाचवीत शिकत होता. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर हिंगोणे आणि कळमसरे गावावर यामुळे शोककळा पसरली आहे. दरम्यान मकरसंक्रांतीला रविवारी राज्यात दिवसभर पतंग बाजीचा उत्साह दिसून आला. मात्र अनेक भागात मांजामुळे नागरिकांसह पशुपक्षी जखमी झाल्याच्या घटना समोर आल्या. यातच नागपुरात देखील एका अकरा वर्षीय मुलाचा नायलॉन मांजाने गळा चिरल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली तर दुसरीकडे जळगाव जिल्ह्यात देखील विहिरीत पडून दहा वर्षे मुलाचा मृत्यू झाला तर भिवंडीत एका दुचाकीस्वाराचा गळ्याला मांजा अडकल्याने मृत्यू झाला. दिवसभर मांजाने कोणाचा गळा, कोणाचा चेहरा, कोणाची बोटे, कोणाचा पाय कापला गेल्याची 20 ते 25 हून अधिक प्रकरणे समोर आली. यात लहान मुलांची संख्या सर्वाधिक होती.
नाशिक जिल्ह्यातही अनेक घटना
नाशिक शहरासह जिल्ह्यात नायलॉन मांजामुळे जखमी झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या. मकरसंक्रांतीच्या पूर्वसंध्येलाच एका दहा वर्षे मुलीचा मांजाने गळा कापल्याने जखमी झाल्याची घटना घडली. ही मुलगी मामा सोबत घरी जात असताना वाटेत हा अपघात घडला. तर मकरसंक्रांतीच्या दिवशी नायलॉन मांजामुळे सिन्नर तालुक्यातील वावी येथे दुचाकीस्वाराचा गाल चिरला गेला. येवला तालुक्यातील पाटोदा येथे गळा कापला गेल्याने वृद्ध गंभीर झाला तर शहरातील उंटवाडी येथील तरुण इमारतीवरुन कोसळून जखमी झाल्याची घटना घडली. याचबरोबर जवळपास 15 पक्षांचे पंख कापले गेले. यात तीन कबुतरांचा आणि एका घारीचा दुर्दैवी मृत्यू झाला.