Maharashtra NCP Crisis: अजित पवारांच्या (Ajit Pawar) बंडानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे, यातच आता एकनाथ खडसे यांनी आपली भूमिका स्पष्ट केल्याने राजकारणात चर्चा रंगली आहे. आपली सहा वर्ष आमदारकी शाबूत आहे आणि शरद पवार यांच्यासारखा दिग्गज नेता आपल्या सोबत राहणार असल्याने आपल्याला चिंता नसल्याचं एकनाथ खडसे म्हणाले. शिवाय आपल्याला आता कोणत्या निवडणुका लढवायच्या नाहीत, रोहिणी खडसे या राजकीय वारसा पाहतील, अशी भूमिका एकनाथ खडसे यांनी जाहीर केल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.


राष्ट्रवादी पक्षात अजित पवार यांनी बंड पुकारत भाजप आणि शिंदे गटाच्या सरकारमध्ये सहभागी होणं पसंत केलं आहे. यावेळी राष्ट्रवादी पक्षातील अनेक दिग्गज नेतेही अजित पवारांसोबत गेल्याने शरद पवारांसोबत राहिलेल्या एकनाथ खडसेंसाठी मात्र चांगलाच अडचणीचा विषय बनला असल्याचं मानलं जात आहे. त्यांच्या राजकीय भवितव्यावर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात असून त्यांच्या समर्थकांमध्ये चिंतेचं वातावरण पाहायला मिळत आहे.


भाजपमध्ये मंत्री असताना एकनाथ खडसे यांच्यावर विविध भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. पक्षाची बदनामी होत असल्याचं लक्षात येताच भाजपने एकनाथ खडसे यांचा राजीनामा घेत त्यांना वाळीत टाकल्याचं पाहायला मिळालं होतं. भाजपमध्ये भवितव्य नसल्याचं लक्षात येताच एकनाथ खडसेंनी शरद पवारांच्या हातात हात घेत राष्ट्रवादी पक्षात जाणं पसंत केलं होतं. त्यांच्या या निर्णयानंतर शरद पवारांनी त्यांना आमदारकीचं बक्षिस दिल्याने खडसे पुन्हा राजकारणात सक्रिय झाल्याचं पाहायला मिळालं होतं.


सध्या भाजप आणि शिंदे गटाचं सरकार असलं तरी आगामी निवडणुकांत महाविकास आघाडी सरकार निवडून येईल आणि आपल्याला मंत्रिपद मिळेल, अशी आशा एकनाथ खडसे आणि त्यांचा समर्थकांना होती. मात्र गेल्या दोन दिवसांत राष्ट्रवादी पक्षात झालेला राजकीय भूकंप एकनाथ खडसे यांच्या राजकीय भवितव्यावर प्रश्न चिन्ह उपस्थित करून गेला आहे. कारण, अजित पवार हे राष्ट्रवादी पक्षामधील अनेक आमदार आणि दिगाज नेत्यांना सोबत घेऊन भाजप आणि शिंदे गटाच्या सरकारमध्ये सहभागी झाले आहेत, त्यामुळे त्यांची  विधान परिषदेची आमदारकी भक्कम असली तरी एकनाथ खडसेंसाठी आगामी राजकीय काळ अडचणीचा विषय बनला असल्याचं मानलं जात आहे.


एकनाथ खडसे अजित पवारांसोबत गेले असते तरी, ज्या भाजपमधून त्यांना बाहेर पडावं लागलं होतं त्यातील नेते त्यांना पुन्हा कितपत स्वीकारणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे तिकडे जाऊन कोणताही फायदा एकनाथ खडसे यांना दिसत नसल्याने खडसे आज शरद पवारांसोबतच थांबल्याचं पाहायला मिळत आहे.


सध्याच्या परिस्थितीचा विचार करता शरद पवार हा जाणता राजा आणि राजकारणातील बाप माणूस म्हणून ओळखलं जाणारं व्यक्तिमत्व मानलं जात असलं तरी वाढतं वय आणि जवळची जवळपास सगळीच मंडळी त्यांना सोडून गेल्याने शरद पवार यांच्या गटाला किंवा खडसे यांच्या वाट्याला फारसं काही येईल अशी शक्यता राजकीय विश्लेषकांना सध्याच्या परिस्थितीवरून तरी दिसत नाही. मात्र एकनाथ खडसे हे देखील अतिशय मुरब्बी नेते म्हणून त्यांची राज्याला ओळख आहे, तर दुसरीकडे  राजकारणातील भीष्म  मानले जाणारे आणि पन्नास वर्षांहून अधिक वर्षांचा अनुभव असलेले शरद पवार हे दोन्ही नेते एकाच बाजूला असल्याने राजकारणात कोणताही चमत्कार ते घडवू शकतात, असा विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांना आहे.


खडसेंना पुन्हा मंत्रिपद मिळू शकतं किंवा ते मुख्यमंत्री पदाचे दावेदारही राहू शकतात, असा दावा केला जात असला तरी आज मात्र त्यांच्या पुढील राजकीय भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थिती केलं जात आहे.


हेही वाचा:


Health Tips: सकाळी रिकाम्या पोटी पाण्यात लिंबू पिळून प्यावं; आरोग्यावर होतात 'हे' सकारात्मक परिणाम