Jalgaon News:  नांदेडमध्ये दीडशे कोटी रुपये देतात आणि 15 तालुके मिळून जिल्हा असलेला जळगावला केवळ 48 कोटी रुपये देतात हा अन्याय मी सहन करणार नाही असं म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिंदे सरकारला घरचा आहेर दिला आहे. जळगाव जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागाची  कंत्राटदारांची साडे 300 कोटी रुपयांची बिले अडकली आहेत.  त्यावर मंत्री गुलाबराव पाटील बोलत होते.


सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कंत्राटदारांची 350 कोटी रुपयांची बिल अडकली आहेत. त्यामुळे आर्थिक संकटात सापडले आहेत. थकित बिलाची रक्कम मिळावीत यासाठी कंत्राटदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर आंदोलन केले. या आंदोलनाला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भेट दिली. यावेळी कंत्राटदारांनी मंत्री गुलाबराव पाटील यांना त्यांच्या मागण्यांचे निवेदन दिले. 


जळगाव जिल्ह्यात शिवसेना व भाजपचे मिळून एकूण दहा आमदार आहेत. असे असतानाही पाहिजे त्या तुलनेत  पैसे मिळत नाही. हा जळगाव जिल्ह्यावर अन्याय आहे आणि या न्यायाविरुद्ध मी बोलणार असल्याचे यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी ठणकावून सांगितलं. 300 कोटींची बिले आणि केवळ 48 कोटी रुपये देतात, रस्ते , पुलांची कामे कशी होतील असा प्रश्न त्यांनी केला. दुसरीकडे नांदेडमध्ये 150 कोटी रुपये देतात आणि जळगाव सुद्धा मोठा जिल्हा असताना जळगावला केवळ 48 कोटी देतात. हा अन्याय मी सहन करणार नाही. या संदर्भात कॅबिनेटमध्ये प्रश्न मांडणार असून तसेच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. जळगावच्या विकासासाठी पैसे कमी पडू देणार नाही असे मंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी सांगितले.


उद्धव यांच्या टीकेवर भाष्य करण्यास नकार


भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावरून उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाच्या आमदारांवर कडाडून टीका केली आहे. यावर प्रश्न विचारतात मंत्री गुलाबराव पाटील भडकले. शेतकऱ्याच्या बांधावर कोण गेलं,  हे उद्धव ठाकरे यांना विचारा असा उलट सवाल त्यांनी केला. मंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेवर बोलणं टाळलं.


उद्धव  ठाकरे यांची टीका 


बाबरी जेव्हा पाडली तेव्हा हे सगळे 'उंदीर' बिळात  लपले होते.  भाजपकडे कोणतंही शौर्य नव्हतं. बाबरी पाडली त्या वेळी दंगली झाल्या त्यावेळी आमची सत्ता नव्हती तरीही आम्ही मुंबई वाचवली. आता हे सगळे बिळातून बाहेर आले आहेत, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती. चंद्रकांत पाटील यांनी बाळासाहेब ठाकरेंबद्दल वादग्रस्त दावा केला  त्यावर उद्धव प्रतिक्रिया दिली. चंद्रकांत पाटलांचा राजीनामा घ्यावा अन्यथा मुख्यमंत्री एकनाथ  शिंदेंनी राजीनामा द्यावा, असे आव्हान उद्धव ठाकरेंनी दिले आहे.