Maharashtra Jalgaon News: प्रचंड जिद्द आणि आत्मविश्वास असला की, आपण आकाशालाही ठेंगण करु शकतो, या वाक्याला जळगाव (Jalgaon) चाळीसगावातील (Chalisgaon) रेखा पुना धनगर मुलीनं खरं ठरविलं आहे. ट्रॅक्टरवर चालक म्हणून काम करणाऱ्या मजुराची मुलगी रेखा हिची बेसबॉलच्या भारताच्या महिला संघात निवड झाली आहे. हाँगकाँग (Hong Kong) येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत रेखा ही भारताचं प्रतिनिधीत्व करणार आहे. रेखा हिच्या कामगिरीमुळे जळगावचं नाव पुन्हा देशात नव्हे, तर सातासमुद्रापार पोहचलं आहे. अतिशय हलाखीच्या परिस्थितीत रेखा हिनं संपादन केलेलं यश आणि तिची कामगिरी ग्रामीण भागातील मुलींसाठी नक्कीच प्रेरणादायी अशीच आहे.
चाळीसगावातील वाघळी या गावातील रेखा ही अतिशय गरीब कुटुंबातील. तिचे वडील ट्रॅक्टरवर चालक म्हणून मजुरी काम करतात. चाळीसगावातील राष्ट्रीय महाविद्यालयात अकरावी ते पदवीपर्यंत रेखा हिचं शिक्षण पूर्ण झालं आहे. याठिकाणी शिकत असताना जेव्हा रेखा बेसबॉल खेळायला मैदानात उतरली, त्याचवेळी क्रीडा प्रशिक्षक अजय देशमुख यांनी रेखा हिला पारखलं. रेखा हिला त्यांनी बेसबॉलचं प्रशिक्षण दिलं. हलाखीची परिस्थिती असल्यानं रेखा हिच्या मार्गात कुठलाही अडथळा निर्माण होवू नये यासाठी अजय देशमुख यांनी असोसिएशन माध्यमातून तसेच वैयक्तिकरित्या खर्चाची जबाबदारी उचलली. रेखा हिनेसुद्धा प्रशिक्षक अजय देशमुख यांचा विश्वास सार्थ ठरविला. रेखा हिने भारताच्या बेसबॉल महिला संघात आपलं स्थान निश्चित केलं आहे. रेखा हिची भारतीय संघात झालेली निवडही मोठ्या अभिमानाची अन् गर्वाची गोष्ट असल्याचं प्रशिक्षक अजय देशमुख सांगतात.
कधी स्वप्नातही विचार केला नव्हता, मात्र मेहनत करत राहिले, त्यांचं फळ मिळाल्याचं रेखा सांगते, या यशाचं श्रेय ती, तिच्या आई-वडिलांबरोबरच, क्रीडा शिक्षक अजय देशमुख यांना देते. भारतीय संघात निवड झाल्याचा प्रचंड आनंद असून या स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक मिळवून देण्याचा विश्वास बोलताना रेखा हिनं व्यक्त केला आहे. माझ्या प्रमाणेच ग्रामीण भागातील इतरही आंतराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडावेत म्हणून भविष्यात प्रयत्न करणार असल्याचंही रेखा सांगते. आई वडीलांबरोबरच लग्नानंतर पती तसेच सासरचेही माझ्या पाठीशी भक्कमपणे उभं असल्याचं रेखा सांगते.
रेखा हिच्या यशामुळे केवळ चाळीसगावचे नाहीतर संपूर्ण जिल्ह्यात नाव देशपातळीवर उज्वल झाले असून रेखा हिच्या भारतीय संघात निवड झाल्याचा मोठा अभिमान चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी बोलतांना व्यक्त केला आहे. तसेच भविष्यात रेखा हिला कुठलीही अडचण येऊ नये आमदार मंगेश चव्हाण आणि मंत्री गिरीश महाजन यांनी रेखांच पालकत्व स्विकारत कौतुकाची थाप दिली आहे. आम्ही कधी मुंबई पाहिली नाही आणि आमची मुलगी चक्क विदेशात भारतासाठी खेळायला जात असल्यानं या गोष्टींचा रेखा हिच्या वडील तसेच आईलाही मोठा अभिमान आहे. हे सांगतांना रेखा हिचं कौतुक करतांना वडील आणि आईची छाती गर्वाने फुलून येते.