जळगाव :  राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील ( Gulabrao Patil ) चांगलेच चर्चेत आले होते. आपण चुकून राजकारणात पडलो असल्याची कबुली गुलाबराव पाटील यांनी दिली. फक्त नोकरी आणि छोकरी एवढंच होते, असेही पाटील यांनी म्हटले. जळगावमध्ये (Jalgaon) उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या 'युवारंग महोत्सवा'त ते बोलत होते. 

Continues below advertisement

मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, नोकरी आणि छोकरी एवढंच माझं स्वप्न होते. मी राजकारणात चुकून आलो. मी राजकारणात यावे असे माझे कधी स्वप्न नव्हते. मला राजकारणाची आवड देखील नव्हती, असेही त्यांनी सांगितली. महाविद्यालयीन जीवनात नाटकात काम करण्याची आवड होती. त्यातून चांगलं बोलण्याची कला अवगत झाली होती.  त्यावेळी आपल्या गावात नुकतीच बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची शाखा आपल्या गावात स्थापन झाली होती. या शाखेत आपण यावे आणि आपण तरुणांना संबोधित करावे असे अनेकांना वाटत होते. त्यातूनच आपला राजकारणात प्रवेश झाला आणि कधी नव्हे ते बाळासाहेब ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यात आपल्याला बोलण्याची संधी मिळाली आणि आपण राजकारणात घट्ट रोवलो गेलो असल्याचे गुलाबराव पाटील यांनी म्हटले. 

महाविद्यालयीन जीवनात आपण अवगत केलेली वकृत्व कला आणि नाटक याचा राजकारणात फायदा झाला असल्याचे त्यांनी म्हटले. राजकारणात ही आपल्याला नेहमी या दोन्ही गोष्टींचा उपयोग झाला आहे. नाहीतर शिक्षण घेऊन नोकरी करावी आणि लग्न करावे एवढेच आपले स्वप्न होते असेही त्यांनी म्हटले.

Continues below advertisement

शाखा सुरू केली आणि पाचव्या दिवशी गुन्हा दाखल

दरम्यान, एबीपी माझाच्या माझा कट्टावर गुलाबराव पाटील यांनी संवाद साधताना विविध मुद्यांवर भाष्य करताना, जुन्या आठवणींना उजाळा दिला होता. गुलाबराव पाटील यांनी माझा कट्टामध्ये आपल्या शिवसेना प्रवेशाबाबतचा किस्सा सांगितला. 1987 च्या सु्मारास आम्ही काही लोकांनी मिळून शिवसेनेत दाखल झालो. आमच्याकडे शाखा सुरू केली आणि पाचव्या दिवशी एका आंदोलनात गुन्हा दाखल झाला असल्याचे त्यांनी म्हटले.  राजकारणात प्रवेश करणार नव्हतो. कुटुंबाची परिस्थिती सांभाळण्याचे आव्हान होते. राजकारण हा माझ्यासाठी पहिला पर्याय कधीच नव्हता असेही त्यांनी सांगितले. 1990 मध्ये शिवसेनेचा पहिला आमदार आमच्या जिल्ह्यातून निवडून आला होता. त्यावेळी 40 गावांची जबाबदारी आली होती अशी आठवणही त्यांनी सांगितली. वयाच्या 26 व्या वर्षी 1996 मध्ये मला बाळासाहेबांनी जिल्हाप्रमुख केले. त्यानंतर जिल्हा परिषद, सभापती आणि 1999च्या निवडणुकीत आमदार झालो असल्याची आठवण गुलाबराव पाटील यांनी सांगितली.