जळगाव : सिंचन घोटाळ्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या खुलाशावरुन सध्या राज्यातलं राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तासवागच्या सभेत बोलताना अजित पवार यांनी माजी गृहमंत्री आर आर पाटील (R R Patil) यांचा उल्लेख करत सिंचन घोटाळ्याबाबत भाष्य केलं होतं. आर. आर. पाटील यांनी सिंचन घोटाळ्याच्या खुल्या चौकशीची परवानगी देऊन केसाने गळा कापला, असे त्यांनी म्हटले होते. अजित पवारांनी केलेल्या धक्कादायक खुलाशानंतर आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केला. सिंचन घोटाळ्याचा फाईलवर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची सही असल्याचे त्यांनी म्हटले. आता यावरून मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी जयंत पाटील यांना खोचक टोला लगावला आहे.
गिरीश महाजन म्हणाले की, जयंत पाटील यांच्याबाबत काय बोलावे? अडीच वर्ष तुमचं सरकार होतं, तुम्ही जलसंपदा मंत्री होतात. त्यावेळी त्यांना हे सुचले नाही का? आता निवडणूक आठ दिवसांवर आल्याने त्यांना स्वप्न पडलं की, त्यावर सही आहे. अडीच वर्ष तुम्ही झोपले होते का? त्यावेळी तुम्हाला कळाले नाही देवेंद्र फडणवीस यांच्या त्या फाईलवर सह्या आहेत. आता खोटे बोलणे, रेटून बोलणे, ते अभ्यासू व्यक्तिमत्व आहेत, पण ते अशा पद्धतीने बोलत असतील तर त्यांची कीव करावी वाटते, असा टोला त्यांनी जयंत पाटील यांना लगावला.
उद्धव ठाकरेंचा छोटासा पक्ष, आम्ही समुद्र
दरम्यान, अमित शाह जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. याबाबत गिरीश महाजन म्हणाले की, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांची जाहीर सभा पार पडत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर महाराष्ट्रातून प्रचाराची सुरुवात केली आहे. 14 तारखेपर्यंत जवळपास 10 सभा ते महाराष्ट्रात घेणार आहेत. राज्यात आमचे केंद्रातील सर्व नेते हे महाराष्ट्र प्रचार करणार आहेत, असे त्यांनी म्हटले. पायाखालची वाळू घसरली म्हणून केंद्रातील नेत्यांना महाराष्ट्रात प्रचार करावा लागत आहे, अशी टीका विरोधक करत आहेत. याबाबत विचारले असता गिरीश महाजन म्हणाले की, उद्धव ठाकरे टीका करत आहेत. उद्धव ठाकरेंचे देशामध्ये काही आहे का? त्यांचा छोटासा पक्ष आहे. आम्ही समुद्र आहोत. पवार साहेबांचे काय आहे? महाराष्ट्र सोडला तर त्यांचे अस्तित्व कुठे आहे? त्यामुळे अशा प्रकारची टीका करू नये. जेव्हा निवडणुका असतात तेव्हा आमचे नेते प्रत्येक राज्यात प्रचार करतात. निवडणुकीचा निकाल 23 तारखेला लागल्यावर विरोधकांना कळेल की, आपली जागा काय आहे, असे प्रत्युत्तर त्यांनी दिले आहे.
गिरीश महाजनांचा एकनाथ खडसेंवर निशाणा
जामनेरमध्ये एकनाथ खडसे तळ ठोकून आहेत.महाविकास आघाडीचा उमेदवार जामनेरमध्ये निवडून येणार, असा दावा त्यांनी केलाय. याबाबत गिरीश महाजन म्हणाले की, खडसेंना माझ्या शुभेच्छा आहेत. त्यांच्या दोन सभा जामनेरमध्ये झाल्या आहेत. त्यांनी पुन्हा पुन्हा तिथे यावे. त्यांना जर मला पाडायचे असेल तर दोन-तीन सभा घेऊन चालणार नाही. त्यांनी जामनेरमध्येच बसून राहावे. वाटल्यास त्यांची व्यवस्था मी करतो, असा टोला त्यांनी एकनाथ खडसेंना लगावला आहे.
आणखी वाचा