Jalgaon Agriculture News : राज्यात थंडीचा जोर वाढला (Cold Weather) आहे. अनेक जिल्ह्यात तापमान (Temperature) 10 अंश सेल्सिअसच्या खाली गेलं आहे. या वाढत्या थंडीचा शेतकऱ्यांच्या पिकांवर परिणाम होत असल्याचं चित्र दिसत आहे. जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातही थंडीचा कडाका वाढला आहे. त्यामुळं केळी उत्पादक शेतकरी (Banana Farmers) चिंतेत आहेत. कारण वाढत्या थंडीमुळं केळीवर चरका आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळं कोट्यवधी रुपयांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 


साडेपाचशे कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज 


जळगाव जिल्ह्यात गेल्या आठ दहा दिवसापासून थंडीचा जोर वाढला असल्यानं तापमान किमान पाच अंश पर्यंत जाऊन पोहोचले आहे. या न्यूनतम तापमानामुळं जळगाव जिल्ह्यात केळी पिकावर चरका रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. एकूण लागवडीच्या पन्नास हजार हेक्टर क्षेत्रापैकी दहा हजार हेक्टर क्षेत्रावर याचा प्रादुर्भाव झाल्यानं जवळपास साडेपाचशे कोटी रुपयांचा नुकसान झाल्याचा अंदाज केळी तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. अजूनही थंडीचा कालावधी वाढला तर हे नुकसान अधिक वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 


बदलत्या वातावरणाचा तूर हरभरा पिकांनाही फटका 


वातावरणात सातत्यानं बदल (Climate Change) होत आहे. या वातावरणातील बदलाचा शेती पिकांवर (Agriculture Crop) परिणाम होत असल्याचं चित्र दिसत आहे. कुठे थंडी आणि तर कुठे ढगाळ वातावरण आहे. तापमानात (Temperature) सातत्यानं चढ उतार होत आहे. अशा बदलणाऱ्या वातावरणामुळं पिकांवर रोगराई पडण्याचा धोका निर्माण झाला आहे.  थंडीमुळं आणि धुक्यामुळं रब्बी पिकांना धोका निर्माण झाला आहे. तूर, कापूस, हरभरा, कांदा पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे. हरभऱ्यावर घाटे अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत.  अतिवृष्टीच्या फटक्यानं आधीच शेतकऱ्यांची खरीपाची पीक वाया गेली आहेत. त्यात आता उरल्या सुरल्या शेतखऱ्यांच्या आशा रब्बी पिकांवर आहे. मात्र, बदलत्या हवामानाचा मोठा फटका पिकांना बसत असल्यानं शेतकरी चिंतेत आहेत.  


आंब्यासह काजू आणि सुपारी पिकावरही परिणाम


बदलत्या वातावरणाचा कोकणातील शेतकऱ्यांना देखील फटका बसत आहे. आंबा, काजू आणि सुपारी उत्पादक शेतकरी देखील चिंतेत आहेत. कारण बदलत्या वातावरणामुळं पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे.  सुपारीला गळ लागली आहे. गळ लागलेल्या सुपारीला योग्य दर नाही, त्यामुळं सुपारी फेकून देण्याची वेळ आली आहे. तळकोकणात मोठ्या प्रमाणावर सुपारीचे उत्पादन घेतलं जातं. मात्र, येथील सुपारी उत्पादक शेतकरी सध्या अडचणीत सापडला आहे.


महत्त्वाच्या बातम्या: 


Agriculture News : हरभरा पिकावर घाटे अळीचे आक्रमण, वाशिम जिल्ह्यात रब्बी पीक धोक्यात; शेतकऱ्यांना आर्थिक फटका