Jalgaon Lok Sabha Seat :  लोकसभा निवडणुकीला अद्याप वेळ असला तरी युती आघाडींमध्ये जागा वाटपावरून जोरदार मतभेद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजपने कल्याण लोकसभा जागेवर दावा सांगितला होता. त्यानंतर शिवसेना शिंदे गट आणि  भाजप आमनेसामने आले होते. त्यानंतर आता जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या दाव्यावरून दोन्ही पक्ष आमनेसामने येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जळगाव लोकसभा मतदार संघाच्या जागेवर भाजपा आणि शिवसेना शिंदे गट  या दोघांनी आपला दावा सांगितल आहे. त्यामुळे महायुती मधील दोन्ही पक्ष आमने सामने आल्याचं पाहायला मिळत आहे. 


जळगाव लोकसभा मतदार संघाचा विचार केला तर या भागात शिवसेना शिंदे गटाची ताकद जास्त आहे.  त्यामुळे ज्याची जास्त ताकद, त्याला जागा मिळावी या तत्वानुसार ही जागा शिवसेनेला मिळायला हवी आणि तो आमचा दावा सुद्धा आहे अशी भूमिका शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख निलेश पाटील यांनी मांडली. आतापर्यंत याच तत्वानुसार आम्ही भाजपाला 35 वर्ष सहकार्य केले आहे. आता भाजपाने ही आम्हाला सहकार्य करावे अशी भूमिका शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख निलेश पाटील यांनी जाहीर केली आहे. पाटील यांच्या भूमिकेनंतर राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय बनला आहे. 


भाजपने काय म्हटले?


दुसरीकडे जळगाव लोकसभा असो किंवा रावेर या दोन्ही ठिकाणी भाजपाचे नेहमीच प्राबल्य राहिले आहे. निवडणुका तोंडावर आल्यावर काही अती उत्साही कार्यकर्ते अशी वक्तव्य करीत असतात. अशा कार्यकर्त्यांनी पक्ष श्रेष्ठी यांच्याशी चर्चा करून मग वक्तव्य करायला हवी असे भाजप आमदार सुरेश भोळे यांनी म्हटले.  जागा वाटप करण्याचा अधिकार हा एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणीस यांना आहे. तेच समन्वयामधून या बाबत निर्णय घेतील,असेही त्यांनी म्हटले. मागील काळापासून दोन्ही लोकसभा मतदार संघावर भाजपाचे वर्चस्व राहिले आहे. पुढील काळात ही या दोन्ही जागा भाजपाकडेच राहतील असा विश्वासही आमदार सुरेश भोळे यांनी व्यक्त केला आहे. 


कल्याणवरूनही वाद 


भाजपा आणि शिंदे गटाच्या दोन्ही नेत्यांनी केलेली ही वक्तव्य पाहता जळगाव लोकसभा मतदार संघावरून महायुती मधील हे दोन्ही पक्ष एकमेकां समोर उभे राहण्याची चिन्हे आता दिसू लागली आहेत. या आधीदेखील कल्याण लोकसभा मतदारसंघावर भाजपने दावा केला होता. या मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे खासदार आहेत. भाजपने या मतदारसंघावर दावा केल्याने वादाला तोंड फुटले होते.