जळगाव : पुण्यातील भरधाव पोर्शे कार अपघाताच्या घटनेनंतर पुन्हा एकदा हीट अँड रनप्रकरण चर्चेत आलं आहे. पुण्यात बड्या बापाच्या मदमस्त पोराने दोन निष्पाप तरुणाईचा जीव घेतल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त झाला. विशेष म्हणजे केवळ 15 तासांत या अल्पवयीन मुलास जामीन मिळाल्याने संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर, गृह विभागाने गंभीर दखल घेत प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या वडिलांसह पब मालकासही अटक केली. मात्र, अशाचप्रकारे जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात 15 दिवसांपूर्वी अपघात (Accident) झाला होता. त्यात, 4 जणांचा जागीच मृत्यू झाला, पण पोलिसांनी एकाही आरोपीला अटक न केल्याने संताप व्यक्त होत होता. आता, याप्रकरणी दोन्ही आरोपींना पोलिसांनी मुंबईतून अटक केली आहे.

  


जळगावमध्ये चारचाकी वाहनाच्या धडकेत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला होता. विशेष म्हणजे कारचालकांनी कारची रेस लावली होती, त्यातूनच हा अपघात झाल्याचं समोर आलं. मात्र, या अपघाता अख्ख कुटुंब मृत्यूमुखी पडल्याने तीव्र संतापही स्थानिकांनी व्यक्त केला होता. मात्र, यातील आरोपी रुग्णालयात उपचार घेत असल्याने त्यांच्यावर अटकेची कारवाईही करण्यात आली नाही. त्यामुळे, पुण्याच्या घटनेत एक आणि जळगावच्या घटनेत वेगळा न्याय का, असा सवाल उपस्थित केला जात होता. त्यानंतर, जळगाव अपघातप्रकरणी दबाव वाढल्याने पोलिसांनी दोन्ही आरोपींना मुंबईतून ताब्यात घेतलं. 


जळगावच्या रामदेववाडी येथील अपघात प्रकरणाचा तपास एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक ए.सी.मनोरे यांच्याकडून काढून घेण्यात आला. त्यानंतर, डीवायएसपी संदीप गावीत यांच्याकडे हा तपास सोपविण्यात आला होता. या घटनेत अर्णव अभिषेक कौल हा कार चालवित असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याची माहिती आहे. 


अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू


जळगाव तालुक्यातील रामदेववाडीला आशा वर्कर असलेल्या वत्सला सरदार चव्हाण (वय २७) या काम संपवून मुलगा सोहम (वय ८), सोमेश (वय २, सर्व रा. लॉद्री, ता. जामनेर ह. मु. रामदेववाडी, ता. जळगाव) व भाचा लक्ष्मण नाईक (वय १७, रा. मालखेडा, ता. जामनेर) हे मंगळवार, ७ मे रोजी दुचाकीने शिरसोली येथे येत होत्या.
रामदेववाडी गावाच्या पुढे भरधाव कारने (क्र. एम.एच. १९ सी.व्ही. ६७६७) चव्हाण यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात वत्सला व मुलगा सोमेश चव्हाण हे दोघे जागीच ठार झाले. तर, सोहम चव्हाण याला शासकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणल्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. 


मुंबईतील रुग्णालयातून अटक


रामदेव वाडी रेसिंग कार अपघाता चार जणांचा जागेवरच मृत्यू झाला होता. त्यानंतर, स्थानिकांनी या घटनेतील कारचालकांना घटनास्थळावरच चोप दिला. त्यामध्ये, ते जखमी झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. आरोपींना पुढील उपचारासाठी मुंबईला हलविण्यात आले होते. मात्र, रुग्णालयात उपचार घेत असल्याने त्यांच्यावर अद्याप अटकेची कारवाई न झाल्याने नातेवाईक आणि गावकऱ्यांमधे रोष होता. आज यातील अक्षय कौल आणि अखिलेश पवार या दोन्ही आरोपींना जळगाव पोलिसांनी बॉम्बे हॉस्पिटलमधून ताब्यात घेतले आहे. आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर अटकेची कारवाई झाल्या मुळे रोष कमी होण्याची शक्यता आहे. अपघातावेळी अपघातग्रस्त कारमध्ये गांजादेखील आढळून आला होता, या गांज्याच सेवन या आरोपींनी केले होते का याबाबत रक्ताचा अहवाल उद्यापर्यंत मिळण्याची शक्यता असल्याचं आणि उद्याच या आरोपींना कोर्टात देखील हजर केले जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे. दरम्यान, आरोपी ताब्यात घेऊन त्यांच्यावर अटकेची कारवाई झाल्यास रोष कमी होण्याची शक्यता आहे.


खडसेंनी दिला होता इशारा


दरम्यान, रामदेव वाडी अपघातास जबाबदार असणाऱ्यांवर अटकेची कारवाई करण्यात यावी, अन्यथा आपण बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा एकनाथ खडसे यांनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना पत्राद्वारे दिला होता. त्या इशाऱ्यानंतरच आज आरोपींना अटक करण्यात आल्याचं खडसे यांनी म्हटलं आहे.