Jalgaon News : दोन कारमध्ये लागलेली शर्यत (Car Race) अकरा वर्षीय शाळकरी मुलाच्या जीवावर बेतली. कारची धडक बसून झालेल्या भीषण अपघातात मुलगा सायकलीसह दहा फूट उंच फेकला जाऊन खाली पडला आणि त्याचा जागेवरच मृत्यू झाला. जळगाव (Jalgoan) शहरात मेहरुण तलाव परिसरात ही रविवारी (28 ऑगस्ट) ही घटना घडल्याने खळबळ उडाली. या घटनेत पोलिसांनी कार चालक मुलांसह कार मालकाला ताब्यात घेतलं असून त्यांच्याविरोधात गुन्हा दखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
जळगाव शहरातील मेहरुण तलाव परिसरात असलेल्या ट्रॅकवर दोन कारमध्ये शर्यत लागली होती. त्याच परिसरात राहणार विक्रांत मिश्रा हा रविवारी संध्याकाळच्या सुमारास त्या ठिकाणी सायकलवर चालवत होता. त्याचवेळी शर्यतीदरम्यान भरधाव वेगात असलेल्या एका इनोव्हा कारने दुसऱ्या कारला ओव्हर टेक करून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचवेळी या परिसरात सायकलवर खेळत असलेल्या विक्रांत मिश्रा अचानक सायकलवरुन कारसमोर आला. उत्साहाच्या भरात भरधाव वेगात कार चालवणाऱ्या तरुणाचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि त्यात ब्रेक दाबण्याऐवजी वेग वाढवण्याचे एक्सलेटर दाबलं गेल्याने कारचा वेग आहे त्यापेक्षा दुप्पट झाला. परिणामी कारची जबर धडक विक्रांत मिश्रा असलेल्या सायकलीला लागली. धडक एवढी भीषण होती की यावेळी विक्रांत सायकलीसह दहा फूट उंच फेकला गेला आणि रस्त्यावर आदळला. यात जबर दुखापत झाल्याने विक्रांतचा जागीच मृत्यू झाला. तर सायकल मात्र झाडावर अडकून पडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
अपघातात विक्रांत गंभीर झाला असल्याचं लक्षात येताच गाडीतील तिघा तरुणांनी त्याला तातडीने दवाखान्यात नेऊन उपचार करण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत तो मृत्यू झाला होता. या घटनेत मिश्रा परिवारातील एकुलता एक असलेला अकरा वर्षीय विक्रांत मिश्रा यांच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी तीन तरुणांना ताब्यात घेतले आहे. हे तिन्ही तरुण अल्पवयीन असल्याचं सांगण्यात येत आहेत. पोलीस त्याची पडताळणी करुन त्यांच्यासह गाडी मालकावर गुन्हा दाखल करण्याचे काम करत आहेत.
मिश्रा कुटुंबावर दु:खाचा डोंगर
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. विक्रांत हा मेहरुण जलतरण तलावसमोरील विद्या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता चौथीच्या वर्गात शिकत होता. विक्रांत हा मिश्रा परिवारातील एकुलता एक मुलगा आहे. त्याचे वडील संतोष मिश्रा हे जळगाव साऊंड असोसिएशन संघटनेचे सहसचिव म्हणून काम करतात. तर त्यांचा डीजे रिपेअरिंगचा व्यवसाय आहे. एकुलता एक मुलगा गेल्याने मिश्रा कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.