Jalgoan News : जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघावरील (Jalgaon Jilha Sahakari Dudh Utpadak Sangh Maryadit) प्रशासक मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने अवैध ठरवलं असून एकनाथ खडसे यांचं संचालक मंडळ कायम केल्याचा निकाल दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी स्वत: ही माहिती दिली. उच्च न्यायालयाचा हा निकाल राज्याचे कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांच्यासह शिंदे सरकारसाठी मोठा धक्का मानला जात आहे. एकनाथ खडसे यांचं संचालक मंडळ असलेल्या जळगाव जिल्हा दूध संघाची शिंदे सरकारकडून नुकतीच चौकशी करण्यात आली होती. या ठिकाणी मंत्री गिरीश महाजन समर्थकांचे प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात येऊन एकनाथ खडसेंना मोठा धक्का देण्यात आला होता. 


दूध संघावर आधी प्रशासक मग गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी समितीची नेमणूक
जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या संचालक मंडळाची मुदत संपल्यानंतर निवडणुका पुढे ढकलल्या गेल्याने एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे (Mandakini Khadse) यांच्या अध्यक्षतेखाली असलेले संचालक मंडळ बरखास्त करत प्रशासकाची नेमणूक करण्यात आली होती. मंत्री गिरीश महाजन यांच्या गटातील आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह इतरांची वर्णी लागली होती. या दरम्यान या ठिकाणच्या गैर व्यवहाराच्या चौकशीसाठी समिती ही सरकारच्या माध्यमातून नियुक्त करण्यात आली होती. 


दरम्यान, आमदार एकनाथ खडसे गटाकडून काही संचालकांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. खंडपीठाने निकाल दिला असून प्रशासक मंडळ बाजूला सारत पुन्हा संचालक मंडळ कायम केलं आहे, अशी माहिती एकनाथ खडसे यांनी दिली आहे


एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया
सूडबुद्धीच्या राजकारणाला न्यायालयाने दिलेली ही मोठी चपराक असून सत्याचाच विजय झाल्याची पहिली प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी या निकालावर दिली आहे. "शासनाने चुकीच्या माहितीच्या आधारावर हे प्रशासक मंडळ नियुक्त केलं होतं. मात्र न्यायालयाने हे प्रशासक मंडळ बेकायदेशीर असल्याचं ठरवत सूडबुद्धीच्या राजकारणाला मोठी चपराक दिली आहे. दूध संघ बदनाम करण्याचा प्रयत्न होता. मात्र न्यायालयाने प्रशासक मंडळ बरखास्त करत पूर्वीचे संचालक मंडळ कायम केलं आहे, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली आहे.


संबंधित बातम्या


Jalgoan News : मंदाताई खडसे यांच्या अडचणीत वाढ, जळगाव जिल्हा दूध संघाच्या संचालक मंडळावर कारवाईचे आदेश


Eknath Khadse : शिंदे सरकारचा एकनाथ खडसेंना धक्का, जळगाव दूध संघाचं प्रशासक मंडळ बरखास्त, खडसे म्हणाले...