Jalgaon News Update : जळगवामध्ये कारच्या धडकेत अकरा वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्या प्रकरणी कार चालकांसह त्यांच्या पालकांविरोधात गुन्हा दाखल केलाय. पोलिसांनी दोन्ही कार चालकांविरोधात सदोष मनुष्यवधासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झालेले कारचालक अल्पवयीन आहेत. जळगाव शहरातील मेहरूण ट्रॅकवर दोन कारमध्ये लागलेल्या शर्यतीत कारने धडक दिल्याने विक्रांत संतोष मिश्रा या मुलाचा मृत्यू झाला होता. 


दोन कारमध्ये लागलेल्या रेसमध्ये सापडल्याने विक्रांत मिश्रा या अकरा वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल सायंकाळी जळगाव शहरातील मेहरून तलाव परिसरात घडली होती. या घटनेत पोलिसांनी कार चालक अल्पवयीन मुलांसह त्यांच्या पालकांविरोधात गुन्हा दाखाल केला आहे. या घटनेला जबाबदार असलेल्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी मयत विक्रांत याच्या परिवाराने  केली  आहे.  


जळगाव शहरातील मेहरूण ट्रॅकवर दोन कारमधे रेस सुरू होती. यावेळी एका कारला ओव्हरटेक करून दुसरी कार भरधाव वेगाने पुढे जात असताना रस्त्याच्या बाजूने सायकलवर जात असलेला विक्रांत हा अकरा वर्षाचा मुलगा कारच्या समोर आल्याने इनोव्हा कारमधील चालक असलेल्या अल्पवयीन मुलाचे गाडीवरून नियंत्रण सुटले. भरधाव वेगात असलेली कार सरळ विक्रांत याच्या सायकलला धडकली. ही धडक इतकी जोरात होती की विक्रांत हा त्याच्या सायकलीसह दहा फूट उंच फेकला गेला आणि जमिनीवर आदळला. यात तो गंभीर जखमी झाला. बेशुद्ध अवस्थेत असलेल्या विक्रांतला नागरिकांनी अपघातग्रस्त इनोव्हामधून  रूग्णालयात दाखल केले. परंतु, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला. 


मिश्रा परिवारातील एकुलता एक असलेला विक्रांत मयत झाल्यानंतर त्याच्या परिवाराचा आक्रोश सगळ्यांचं मन हेलावून टाकणारा होता. या घटनेत मुलांच्या हातात कार देणाऱ्यांवर खुनाचे गुन्हे दाखल करावे आणि त्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी मयत विक्रतांचा परिवार करीत आहे. "आमचा मुलगा गेला, असा दुसरा कोणाचा जाऊ नये यासाठी अशा बेजबाबदार लोकांवर  कठोर कारवाई  होणे गरजेचे असल्याचं मिश्रा परिवाराचं मत आहे.  


दरम्यान, या प्रकरणी नागरिकांमधून देखील संताप व्यक्त होत आहे. "या परिसरात असलेल्या अवैध धंद्याच्या विरोधात कारवाई करण्यात यावी, परिसरात गस्त वाढवावी, भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांवर कारवाई व्हावी, परिसरात गतीरोधक बसविण्यात यावेत, लहान मुलांच्या हातात वाहने चालविण्यास देणाऱ्या पालकांवर कारवाई व्हावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे. 


पोलिसांनी कार चालकांविरोधात सदोष मनुष्यवधासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. याबरोबरच गाडी मालक मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हे दाखल केले असून दोन्ही कार चालकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 


महत्वाच्या बातम्या


Jalgaon News : शर्यतीने घेतला चिमुकल्याचा बळी, कारच्या धडकेत जळगावमध्ये मुलाचा मृत्यू