Jalgaon News : 'देव तारी त्याला कोण मारी' या म्हणीचा प्रत्यय जळगावमध्ये (Jalgaon) आला. बिबट्याच्या हल्ल्यापासून (Leopard Attack) वाचण्यासाठी लता कोळी या 58 वर्षीय महिलेने तापी नदी (Tapi River) पात्रात उडी मारली. मात्र तापी नदीला पूर (Flood) असल्याने त्या थोडेथोडके नव्हे तर तब्बल 70 किमी वाहून गेल्या होत्या. सलग तेरा तास पुराच्या पाण्यात वाहत जाऊनही लता कोळी जिवंत सापडल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.


जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील कोळमबा गावातील शेतकरी कुटुंबातील लता कोळी या आपल्या शेतात काम करण्यासाठी गेल्या होत्या. सायंकाळ झाल्यानंतर त्या  नेहमीप्रमाणे तापी नदीच्या काठावरुन घरी परतत होत्या. यावेळी त्यांना अचानक त्यांचा कुत्रा वेगाने धावत पुढे आल्याचं लक्षात आलं. त्यांनी मागे वळून पाहिलं असता त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. कारण त्यांच्यापासून काही अंतरावरच असलेला बिबट्या त्यांच्यावर झडप घालण्याच्या तयारीत असल्याचं दिसलं. बिबट्याच्या तावडीत सापडलो तर आपण वाचू शकणार नाही आणि कोणी वाचवायला ही येऊ शकणार नाही हे लक्षात येताच क्षणाचाही विचार न करता लता कोळी यांनी तापी नदी पात्रात उडी मारली आणि बिबट्यापासून आपली सुटका केली.


बिबट्याच्या तावडीतून सुटका झाली असं वाटत असतानाच लता कोळी यांना तापी नदीत मात्र मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला. नदीला पूर असल्याने त्या पुराच्या पाण्यात वाहू लागल्या. थोडंफार पोहता येत असल्याने आठ-दहा किमी वाहून जाईपर्यंत त्यांनी वेळ मारुन नेली होती. मात्र यापुढे आता आपला निभाव लागणार नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी गाव दिसलं की मदतीसाठी आरडाओरड करण्यास सुरु केलं. मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही. याच दरम्यान त्यांना त्यांच्या जवळून केळीचं एक सुकलेले झाडं पाण्यातून वाहत असल्याचं दिसलं. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी हे झाड आपल्या हातांनी पकडलं. याच झाडाचा आधार घेत रात्रीच्या अंधारात तब्बल 13 तास पुराच्या पाण्यात मोठ्या जिद्दीने तग धरला.


लता कोळी यांचा थरारक अनुभव


पुराच्या पाण्यात वाहून जात असताना त्यांना आलेल्या अनुभवाबाबत बोलताना लता कोळी म्हणाल्या की, "वाहत जात असताना एका धरणाच्या दरवाज्यातून त्या खाली फेकल्या गेल्या. त्यावेळी केळीचे झाड सुटणार होतं, मात्र आपण ते सोडलं नाही. याच ठिकाणी दरवाजात आपली साडी अडकल्याने आपण त्या ठिकाणी अडकून पडलो. मात्र पुराच्या पाण्याच्या वेगाने साडी फाटल्याने आणि त्या ठिकाणाहून सुटलो. पुढे जात नाही तोपर्यंत एका गावात लोक पुलावरुन गणपती विसर्जन करत होते. मला ते दिसत होते, त्यांना मदतीसाठी आवाज दिला पण त्यांच्यापर्यंत तो पोहोचू शकला नाही. मात्र विसर्जनासाठी पुलावरुन सोडलेला  एक गणपती माझ्या मस्तकात बसला आणि काही वेळासाठी अंधारी आली." 


अशा अवस्थेतही लता कोळी यांनी केवळ केळीच्या झाडाचा आधार घेत 13 तास पुराच्या पाण्यात काढले. सकाळच्या सुमारास त्या अमळनेर तालुक्यात निमगाव परिसरात नदीच्या किनारी अडकल्या. याठिकाणी काही लोकांना त्यांनी आवाज देत मदतीसाठी बोलावलं. मात्र पोलिसांच्या भीतीने कोणी मदतीसाठी पुढे यायला तयार नव्हतं. लता कोळी यांनी आपली ओळख सांगितली आणि या गावात आपले नातेवाईक राहत असल्याचं सांगितलं. त्यावेळी गावकऱ्यांनी नातेवाईकांच्या मदतीने त्यांना बाहेर काढलं.


संपूर्ण 13 तास पाण्यात जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या लता कोळी यांना बाहेर काढलं खरं, पण पाण्यातून बाहेर आल्यानंतर त्यांची शुद्ध हरपली. नातेवाईकांनी त्यांना उपचारांसाठी डॉक्टारकडे नेलं. शुद्धीवर आल्यावर त्यांनी जी आपबिती सांगितली ती ऐकून गावकरी आणि कुटुंबीय स्तब्ध झाले होते.


हा आपला पुनर्जन्म आहे. आपण आधीपासून देवाची सेवा करत आहोत. यापुढे ही देवाची आणि तापी नदीचा सेवा करत राहणार असल्याचं लता कोळी यांनी म्हटलं आहे. वयाच्या अठ्ठावन्नव्या वर्षी लता कोळी यांनी पुराच्या पाण्यात अख्खी रात्र काढली. इतकंच नाही तर त्या जिवंत परतल्याने 'देव तारी त्याला कोण मारी' या म्हणीचा प्रत्यय आला.


औक्षण करुन लता कोळी यांचं स्वागत


लता कोळी या बेपत्ता झाल्यानंतर त्यांच्या परिवारसह संपूर्ण कोलंबा गावकऱ्यांनी अख्खी रात्र त्यांचा शेती परिसरात शोध घेतला होता. मात्र त्या सापडल्या नाहीत. परंतु चोपड्यातून बेपत्ता झालेल्या लता कोळी थेट अमळनेर तालुक्यात सापडल्याने कुटुंबालाही आश्चर्याचा धक्का बसला. आई परत येईल अशी पुसटशी आशा शिल्लक नसताना आपली आई जिंवत सापडल्याने संपूर्ण कुटुंबाला आनंद झाला. मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या लता कोळी यांचं त्यांच्या कुटुंबाने औक्षण करुन स्वागत केले आणि त्यांचे आशीर्वाद घेतले.