Jalgaon News: जळगाव जिल्ह्यात पाचोरा तालुक्यात (Jalgaon Rain News) झालेल्या ढग फुटीमुळे हिवरा नदीला आलेल्या पुरामध्ये (Flood In Jalgaon) वडगाव टेक या गावातील निकिता भालेराव (Nikita Bhalerao) ही पंधरा वर्षीय शाळकरी मुलगी वाहून जाऊन मरण पावली आहे. आपल्या मामी सरला खरे यांच्यासोबत दुपारच्या सुमारास निकिता ही कपडे धुण्याच्या साठी गेली होती. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने निकिता पुरात वाहू लागताच सोबत असलेल्या तिच्या मामी सरला खरे यांनी तिला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याही वाहू लागल्याने त्यांनी आरडा ओरड केली असता गावातील एक तरुण प्रकाश गायकवाड हा त्यांच्या मदतीसाठी आला, त्याने सरला खरे यांना वाचविण्यामध्ये यश मिळविले असले, तरी निकिता मात्र पाण्यात बुडाल्याने तिला वाचविता आले नाही. दोन दिवसानंतर तिचा मृतदेह हा येरुळी शिवारात नदी पात्रात आढळून आला आहे.
निकिताची आई भारती भालेराव यांचे पतीचे निधन झाल्यानंतर त्या आपल्या भावाच्याकडे मुलीगी निकिता भालेरावसह (Nikita Bhalerao was swept away in water) राहत होत्या. त्या लोकांकडे धुणीभांडी करून आपला उदर निर्वाह करत होत्या. पुढील काळात आपला आधार असलेल्या निकिताच्या शिक्षण घेण्यासाठी त्या प्रयत्न करत असताना निकिता अचानकच वाहून जाऊन मयत झाल्याने निकिताच्या आई पुढे मोठे संकट उभे राहिले आहे. एकीकडे निकिता वाहून गेल्याची माहिती मिळताच तिचे आजोबा शामराव खरे यांना हा धक्का सहन न झाल्याने ते देखील हृदय विकाराच्या झटक्याने मरण पावल्याने भालेराव आणि खरे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेनंतर सरकारने आम्हाला मदत करावी अपेक्षा निकिताच्या नातेवाईकांनी केली आहे.
पाचोरा तालुक्यातील वारखेडी भोकरीमधीलही एक शेतकरी गेला वाहून- (farmer swept away by the water)
जळगाव जिल्ह्यात पाचोरा तालुक्यात झालेल्या ढगफुटी सदृश पावसाने पाचोरा तालुक्यातील वारखेडी भोकरी गावातील शेतकरी सतीश मोहन चौधरी हा शेतकरी गावातील नाल्याच्या पाण्यात वाहून गेल्याने त्यांचे कुटुंब उघड्यावर पडले आहे. सतीश चौधरी यांच्याकडे असलेल्या दोन एकर शेतीमध्ये त्यांनी कापूस पिकाची लागवड केली होती. या शेतात पाणी शिरल्याने शेतातील पाणी काढण्यासाठी ते सकाळीच पाच वाजता शेतात जात असल्याचं त्यांनी घरी सांगितले होते. मात्र दोन तासाच्यानंतर त्यांचा मृतदेहच गावाच्या वेशीवर नाल्यात तरंगताना दिसून आल्याने त्यांच्या परिवारावर मोठे संकट कोसळले आहे.सतीश चौधरी यांना पत्नी, दोन मुली आणि आई आहेत,त्यांच्या कुटुंबाचा तर आधार होते. घरातील करता पुरुषच गेल्याने मुलींच्या सह आपला उदर निर्वाह कसा करायचा, असा प्रश्न त्यांच्या पत्नी पुढे आता पडला आहे. या घटनेला चार दिवस उलटले असले तरी सरकारी पातळीवर या कुटुंबाला मदत करण्यासाठी किंवा विचारपूस करण्यासाठी अद्यापपर्यंत कोणीही आले नसल्याने सरकारी यंत्रणा किती उदासीन आहे, हे पाहायला मिळत आहे. या घटनेनंतर सरकारने आपल्या मुलीच्या शिक्षणसाठी आपल्याला रोजगार देण्याच्यासाठी मदत करावी, अशी मागणी मयत सतीश चौधरी यांच्या पत्नीने केली आहे.