पुतण्याच्या लग्नात बेधुंद नाचताना काकाचा मृत्यू, चाळीसगावातील घटना
Jalgaon Latest News Update : पुतण्याच्या लग्नात बेधुंद होऊन नाचताना हृदयविकाराचा झटक्याने काकाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना उघडकीस आली आहे. चाळीसगाव तालुक्यातील आडगाव या गावात ही घटना रविवारी रात्री घडली आहे. दिनकर मोहन मिस्तरी (वय ४५ रा. सुरत) असे मयत काकाचे नाव आहे. काकाचा मृत्यू झाल्यामुळे लगीनघरी शोककळा पसरली.
सुरत येथील रहिवासी दिनकर मिस्तरी यांचा चाळीसगाव तालुक्यातील आडगाव येथील पुतण्या भूषण मिस्तरी याचा 27 फेब्रुवारी रोजी विवाह निश्चित झाला होता. या विवाहासाठी दिनकर मिस्तरी व त्यांचा भाऊ सुरेश हे दोघेही आपल्या परिवारासह आठवडाभरापूर्वीच सुरत येथून आडगावात आले होते. 26 रोजी सायंकाळी पुतण्या भुषणला हळद लागली. रात्री अंगणात मोठा मंडप टाकला होता. रात्री पाहुण्यांचे जेवण वगैरे झाल्यानंतर लग्नाच्या विधी सुरु झाला. या कार्यक्रमात वधू व वर अशा दोन्हीकडील मंडळी उपस्थित होती. यावेळी भूषण याचे काका दिनकर हे अगदी साडी नेसून सर्वांना लाजवेल असे नाचत आनंद लुटत होते. मात्र नाचत असतांना दिनकर मिस्तरी यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी धावाधाव सुरु झाली. पण त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे लगीनघरी शोककळा पसरली. त्यामुळे दुसऱ्या दिवशी आडगावनजीक असलेल्या उंबरखेड या गावानजीक सोमवारी सकाळी 9 वाजता कानुबाई मातेच्या साक्षीने साध्या पध्दतीने भूषणचा विवाह पार पडला. त्यानंतर दुपारी दोन वाजता भूषणचे काका दिनकर यांच्यावर अत्यसंस्कार करण्यात आले. दिनकर यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.
दिनकर मिस्तरी मूळचे चाळीसगाव तालुक्यातील आडगाव येथील रहिवासी आहेत. दिनकर मिस्तरी व त्यांचा भाऊ सुरेश हे दोघेही काही वर्षापूर्वी व्यवसायानिमित्ताने सुरत येथे परिवारासह स्थायिक झाले आहेत. तर त्यांचे इतर दोन भाऊ अरुण व संजय हे आडगावातच राहत होते, या दोघांचे निधन झाले आहे. दिनकर यांचे भाऊ संजय यांचेच कुटुंबिय आडगावात वास्तव्यास आहे. चार वर्षापूर्वी संजय मिस्तरी यांच्या मुलीचं लग्न निश्चित झाले होते. घरातील पहिलेच लग्न असल्याने कुटुंबात मोठे आनंदाचे वातावरण होते. मात्र यावेळी नियतीला काही औरच मान्य होते. मुलीचा लग्नाच्या संजय यांनी स्वत:च लग्नपत्रिका वाटल्या, अवघ्या पाच दिवसांवर लग्न सोहळा असतांना, सकाळी अंघोळ करत असतांना संजय यांना हृदयविकाराचा झटका आला होता व त्यांचा मृत्यू झाला होता. तर 26 रोजी संजय यांचा मुलगा भूषण याचा विवाह होता. पुतण्याचे लग्न अगदी धुमधडाक्यात करू म्हणून दिनकर व त्यांचा भाऊ सुरेश या दोघे काकांनी सुनियोजन केले. मात्र यावेळी नियतीने डाव साधला. यावेळी पूतण्यावर अक्षदा टाकण्यापूर्वीच काळाने हदयविकाराच्या झटक्याच्या रुपात दिनकर यांच्यावर झडप टाकली. मुलीच्या लग्नाच्या बापाचे अन् मुलाच्या लग्नावेळी काकाचे निधन झाल्याच्या या विचित्र आणि दुर्देवी योगाने सर्व आडगाव गाव सुन्न झाले आहे.