Gold Rate in Jalgaon : सोन्याच्या दरात गेल्या दहा दिवसांत अडीच हजार रुपयांची घसरण झाल्याने सोने (Gold Rate) खरेदी करू पाहणाऱ्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारचा अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर एकाच आठवड्यात सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली. या दरम्यान सोन्याचे दर जीएसटीसह साठ हजार रुपये इतक्या विक्रमी पातळीवर जाऊन पोहोचले होते. मात्र, हळूहळू सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं चित्र सुवर्णनगरी जळगावात (Jalgaon) आहे.


अर्थसंकल्पानंतर सोन्याचे वाढलेले दर हे सर्वसामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेर असल्याने ग्राहकांनी सोनं खरेदीकडे पाठ फिरवली होती. तर, काही ग्राहकांनी सोनं खरेदी करण्याऐवजी आपल्याकडे असलेलं सोनं मोडून दरवाढीचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर मात्र आता सोन्याच्या दरात पुन्हा एकदा हळूहळू घसरण सुरू असून दहा दिवसांत 10 ग्रॅम शुद्ध सोन्याच्या पाठीमागे अडीच हजार रुपये कमी झाल्याने सोन्याचे दर जीएसटीसह 57,500 रूपयांवर आले आहेत. यामुळे  सोनं खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांना काही अंशी का होईना दिलासा मिळाला आहे. त्याचाच परिणाम म्हणून सोनं खरेदीसाठी ग्राहकांचा कल आता वाढू लागला आहे.


ग्राहकांची सोनं खरेदीसाठी गर्दी 


तर, जळगावच्या सुवर्णनगरीत ग्राहकांनी सोनं खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. या दरम्यान ग्राहकांनी दिलेल्या प्रतिक्रियेत असं म्हटलं आहे की, मागील काळात सोन्याच्या दरात मोठी वाढ होऊन हे दर साठ हजार रुपयांच्या वर जाऊन पोहोचल्याने हे दर आमच्या आवाक्याबाहेर गेल्याने आम्ही सोनं खरेदी करणे थांबविले होते. मात्र, आता दहा दिवसांत सोन्याच्या दरात अडीच हजार रुपयांची घसरण झाल्याने आम्ही आज सोने खरेदीसाठी आलो आहोत आणि भाव कमी झाल्याने काही प्रमाणात का होईना जास्तीचे सोने आम्ही खरेदी करू शकणार असल्याचा आनंद असल्याचं सोने ग्राहकांनी म्हटलं आहे.


मुंबईत सोन्याचे दर काय? 


मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याचा दर 55,460 रूपयांवर आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा दर 50,838 रूपयांवर आहे. सोन्याचे कमी झालेले हे दर मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरसह अन्य ठिकाणीही सारख्याच प्रमाणात आहेत. त्यामुळे ग्राहकांना किंचित दिलासा मिळाला आहे. मुंबईत चांदीचे दर देखील काही अंशी कमी झाले आहेत. आज एक किलो चांदीचा दर हजार रूपयांनी कमी होऊन 63,600 रूपयांवर आहे.


महत्त्वाच्या बातम्या : 


Gold Rate Today : आज चांदीच्या दरात हजार रूपयांची घसरण; सोन्याच्या दरात वाढ की घट?