जळगाव: जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत मंदा खडसे यांना पाडण्यासाठी दोन मंत्री, भाजपचे सर्व आमदार-खासदार कामाला लागले आहेत, मात्र शेर तो अकेला होता है.... झुंड मे तो गिधाड आते हैं' असे म्हणत एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर जोरदार टीका करत त्यांना प्रतिआव्हान दिले आहे.
राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेरात राष्ट्रवादी काँग्रेसचा भटक्या विमुक्त जाती सेलचा मेळावा पार पडला. यावेळी भाषणात एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यासह भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत मंदाकिनी खडसे इतक्या पावरफुल आहेत की त्यांना पाडण्यासाठी दोन-दोन मंत्री, भाजपचे सर्व आमदार-खासदार कामाला लागले आहेत. मी इतका पवरफुल आहे की माझ्यामुळे एवढ्या जणांना भिंगरी लागली असे म्हणत आमदार एकनाथ खडसे यांनी दूध संघ निवडणुकीत वेदकांकडून करण्यात येत असलेल्या राजकारणाचा समाचार घेतला. तसेच जय पराभव हा नंतरचा विषय आहे, तुम्हाला मी एकटाच पुरेसा आहे असे म्हणत एकनाथ खडसे यांनी विरोधकांना प्रतिआव्हान दिले आहे.
राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे म्हणाले की, "माझ्या मागे इडी, सीबीआय लावतात. माझ्या जावयाला जेलमध्ये टाकलं. आता मला आणि माझ्या बायकोला जेलमध्ये टाकण्यासाठी यांचे षडयंत्र सुरू आहेत. सत्तेचा माज आणि मस्ती सुरू असून मला बघून घेईन म्हणतात. मात्र मी पण आता बघूनच घेईन."
जामनेरची जागा शिवसेनेची होती, ही जागा भाजपला मिळावी म्हणून मी पुढाकार घेतला असं एकनाथ खडसे म्हणाले. ते म्हणाले की, "सोनिया गांधींच्या सभेला तोड देण्यासाठी शत्रुघन सिन्हांची सभा बोदवडमध्ये न घेता जामनेरात घेण्यासाठी गिरीश महाजन यांनी माझे पाय धरले. माझ्या पुढाकारामुळे गिरीश महाजन निवडून आले. त्यावेळी कोणी नेते जन्माला आले नव्हते. आज हेच लोक मला त्रास देत आहेत."
एकनाथ खडसे यांच्या विरोधात भाजप-शिंदेसेना एकवटली
दूध संघ ताब्यात घेण्यासाठी खडसे आणि गिरीश महाजन यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली असल्याचं पाहायला मिळत आहे. या दोन्ही नेत्यांच्या मध्ये मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह सात आमदार हे एकनाथ खडसे यांच्या विरोधात उभे ठाकले असल्याने खडसे हे एकटे पडल्याचे चित्र आज तरी दिसत आहे. एकनाथ खडसे एकटे पडले दिसत असले तरी त्यांची सहकार क्षेत्रावरील पकड पाहता भाजप-शिंदे गटासाठीही लढाई सोपी नाही. एकूणच आजपर्यंत कोणत्याही दूध संघाची निवडणूक राजकीय आखाडा बनली नसेल अशी जळगाव दूध संघाची निवडणूक आखाडा बनली आहे.
पुढील महिन्यात दहा डिसेंबर रोजी ही निवडणूक होणार आहे. त्यात कायदेशीर लढाई अजून सुरूच आहे. न्यायालयाचा निर्णय लागल्यानंतर कोणाचे पारडे जड ठरते हे कळणार असले तरी आज मात्र काट्याचा संघर्ष यात पाहायला मिळत आहे.