Jalgaon Crime News : शेतात बैल शिरल्याच्या कारणावरुन काका-पुतण्यात हाणामारी झाली. या हाणामारीत पुतण्याचा मृत्यू झाल्याची घटना जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील वाडी (शेवाळे) इथं घडली. या घटनेनं खळबळ उडाली आहे. पुनमचंद भोसले (वय 43) असं मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. हाणामारीची घटना ही 27 नोव्हेंबरला दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली. यांनतर पुनमचंद भोसले यांच्यावर हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु होते. मात्र, बुधुवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
उपचारादरम्यान मृत्यू
बैल शेतात शिरल्याचा राग आल्यानं प्रल्हाद मोतीराम भोसले यांनी पुतण्या पुनमचंद भोसले यांना काठीने मारहाण केली. या मारहाणीत पुनमचंद भोसले यांच्या डोक्याला गंभीर दुखावपत झाली. यानंतर पुनमचंद भोसले यांना जळगावमधील गोदावरी हॉस्पीटलमध्ये गंभीररीत्या जखमी अवसस्थेत दाखल केले होते. त्यांच्यावर उपचार सुरु असतानाच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी प्रल्हाद मोतीराम भोसले यांना अटक केली आहे.
पिंपळगाव (हरेश्वर) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाडी (शेवाळे) ता. पाचोरा येथील प्रल्हाद मोतीराम भोसले आणि त्यांचा पुतण्या पुनमचंद भोसले यांची शेत जमीन शेजारी-शेजारी आहे. पुनमचंद भाऊराव भोसले यांचा मुलगा किरण पुनमचंद भोसले यांची बैलजोडी 27 नोव्हेंबरला दुपारी चार वाजण्याच्या सुमारास प्रल्हाद मोतीराम भोसले यांच्या शेतात शिरली होती. याचा राग आल्यानं प्रल्हाद भोसले आणि त्यांचा मुलगा गणेश भोसले यांनी किरण पुनमचंद भोसले यांच्यासह पुनमचंद भोसले यांनी काठीने मारहाण केली. या मारहाणीत पुनमचंद यांच्या डोक्याला गंभीर दुखावपत झाली. त्यांनतर त्यांना उपचारासाठी जळगावच्या हॉस्पीटलमध्ये नेण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी किरण पुनमचंद भोसले यांनी चुलत आजोबा प्रल्हाद मोतीराम भोसले आणि गणेश भोसले यांच्याविरुध्द 27 नोव्हेंबर रोजी पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक फौजदार रविंद्र पाटील, किरण ब्राह्मणे, अरुण राजपुत यांनी वाडी येथून गणेश भोसले यास ताब्यात घेतल्यानंतर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने गणेश भोसलेंना 30 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अमोल पवार हे करत आहेत. दरम्यान, किरण भोसले यांचे वडिल पुनमचंद भोसले यांची प्रकृती चिंताजनक होती. खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना 30 नोव्हेंबरला सकाळी 10 वाजता पुनमचंद भोसले यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी प्रल्हाद भोसले आणि गणेश भोसले यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या: