जळगाव: अतिप्रसंगाला विरोध करणाऱ्या विवाहितेला पेटवून अज्ञात व्यक्तीने जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना जळगाव जिल्ह्यातील भडगाव शहरात घडली आहे. ही घटना गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.


जळगावमध्ये घडलेल्या या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून महिलांच्या सुरक्षेतेचा प्रश्न  ऐरणीवर असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी भडगाव पोलिसात एका 50 वर्षीय व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास भडगांव शहरातील ओम शांती केंद्राच्या मागे राहत असलेली महिला तिच्या भावाकडे जाण्यासाठी निघाली. वर्दळ नसलेल्या भागातून जात असताना एक 50 वर्षीय अनोळखी पुरुषाने या 47 वर्षीय पीडित विवाहितेचा हात पकडून अश्लील संवाद करत पीडीतेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. 


यानंतर आरोपीने पीडितेकडे  शरीरसुखाची मागणी केली आणि या मागणीला पिडीत महिलेने विरोध करताच आग पेटीने पेटवून देत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी अंगात चॉकलेटी तपकिरी रंगाचा शर्ट, हिरवट पॅट, पायात बूट, बारीक दाढी अशा वर्णनाच्या 50 वर्षीय अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर हे करीत आहेत. 


दरम्यान, पिडीत महिलेवर औरंगाबाद येथे उपचार सुरु असून तिची प्रकृती ठीक असल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली आहे.


गॅस गिझरच्या गळतीमुळे विद्यार्थ्यांचा मृत्यू


दहावीच्या वर्गात शिकत असलेल्या 16 वर्षीय विद्यार्थ्याचा गॅस गिझरच्या गळतीमुळे मृत्यू झाल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील एरंडोल शहरात घडली आहे. अंघोळ करीत असताना गॅस गिझरच्या गळतीमुळे बाथरूममध्येच गुदमरून या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. यश वासुदेव पाटील असे मयत विद्यार्थ्यांचे नाव आहे. कुटुंबातील एकुलत्या एका मुलाच्या दुर्देवी मृत्यूच्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 


बाथरूममध्ये आंघोळ करण्यासाठी गेलेला यश बराच उशीर बाहेर आला नसल्याने त्याच्या कुटुंबीयांनी बाथरूमचा दरवाजा तोडला. त्यावेळी यश हा बाथरूममध्ये खाली पडला होता आणि बाथरूममध्ये गॅस गळतीचा वास येत होता. यशला ताबडतोब खाजगी हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी त्याला तपासल्यानंतर त्याचा मृत्यू झाला असल्याचं सांगितलं. याबाबत दीपक हरसिंग पाटील यांनी दिलेल्या माहितीवरून पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.