Jalgaon: एरंडोल शहरात दहावीच्या वर्गात शिकत असलेल्या 16 वर्षीय विद्यार्थ्यांच्या अंघोळ करीत असताना गॅस गिझरच्या गळतीमुळे बाथरूम मध्येच गुदमरून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. यश वासुदेव पाटील असे मयत विद्यार्थ्यांचे नाव आहे. पाच दिवसांपूर्वी नवीन गिझर घेतले व त्यातच कुटुंबातील एकुलत्या मुलाच्या दुर्देवी मृत्यूच्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
एरंडोल रेणुका नगर परिसरातील रहिवासी व रा ति काबरे विद्यालयातील शिक्षक वासुदेव त्र्यंबक पाटील यांचा मुलगा यश (साई) वासुदेव पाटील हा सकाळी दहा वाजेच्या सुमारास हा बाथरूममध्ये आंघोळ करण्यासाठी गेला होता. बराच वेळ झाला तरी यश बाहेर आला नाही. म्हणून त्याचे वडील वासुदेव पाटील यांनी त्यास हाका मारल्या. मात्र काही प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यांनी व यशचे मामा दीपक जयसिंग पाटील यांनी बाथरूमचा दरवाजा तोडला. त्यावेळी यश हा बाथरूममध्ये खाली पडला होता आणि बाथरूममध्ये गॅस गळतीचा वास येत होता. वासुदेव पाटील व दीपक पाटील यांनी यशला ताबडतोब खाजगी हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी त्याला तपासल्यानंतर त्याचा मृत्यू झाला असल्याचं सांगितलं. याबाबत दीपक हरसिंग पाटील यांनी दिलेल्या माहितीवरून पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुनील लोहार तपास करीत आहेत.
पाच दिवसांपूर्वीच घरात घेतले होते नवीन गॅस गिझर
यश वासुदेव पाटील याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन एरंडोल ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर कैलास पाटील यांनी केले. गॅस गळतीमुळे गुदमरून त्याचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. यश हा एकुलता मुलगा होता. तसेच तो जिल्हापातळीवरील क्रिकेटचा खेळाडू होता. येथील शिवसेना पक्षाचे विधानसभा क्षेत्र प्रमुख जगदीश पुंडलिक पाटील यांचा तो पुतण्या होता. एकुलता एक मुलाच्या आकस्मिक मृत्यूने कुटुंबावर दुखांचा डोंगर कोसळलं आहे. दरम्यान, 15 नोव्हेंबर रोजी वासुदेव पाटील यांनी घरात नवीन गॅस गिझर घेतले होते, त्याला सहा दिवस उलटत नाही तोच दुर्देवी घटनेत गॅस गिझरमुळे वासुदेव पाटील यांच्या मुलाचा दुर्देवी मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती यशच्या नातेवाईकांकडून मिळाली आहे.
इतर महत्वाची बातमी: