Jalgaon News : पोलिसांची चौकशी टाळण्यासाठी अनेक जण अपघातग्रस्ताना मदत करण्याचं टाळतात असे अनेकदा घडतं. मात्र जळगावचे जिल्हाधिकारी (Jalgaon Collector) अमन मित्तल (Aman Mittal) हे एका अपघातग्रस्त दुचाकीस्वाराच्या मदतीला धावून गेल्याने त्याचा जीव बचावला. जिल्हाधिकारी अमन मित्तल हे जळगावकडे येत होते. त्याचवेळी महामार्गावरील अपघातग्रस्त व्यक्तीला त्यांनी पाहिलं. तात्काळ त्याच्या मदतीला धावून जात त्याला रुग्णालयात दाखल केल्याने त्याचे प्राण वाचले. या घटनेतून जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्यातील कर्तव्य आणि माणुसकीचा धर्म या दोन्ही गोष्टीचा प्रत्यय आला. त्यांनी दाखवलेलं प्रसंगावधान हा जळगाव जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे.


नेमकं काय घडलं होतं?


रावेर येथील पूरग्रस्त भागाची पाहताना करुन जळगावचे (Jalgaon) जिल्हाधिकारी अमन मित्तल हे त्यांच्या शासकीय वाहनाने पुन्हा जळगावकडे परत येत होते. त्यावेळी नशिराबाद गावाजवळ महामार्गावर ट्रकच्या धडकेत एक दुचाकीस्वार जखमी झाला असल्याचं त्यांना दिसून आलं. हा दुचाकीस्वार जखमी अवस्थेत असल्याचंपाहून जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी तात्काळ त्यांचं वाहन थांबवले आणि स्वतः वाहनातून खाली उतरले. त्यांनी जखमीची तपसणी केली, तसेच एका कपड्याच्या सहाय्याने जखमीच्या डोक्यातून होत असलेला रक्तस्राव थांबवण्याचा प्रयत्न केला. एवढंच नाही तर जखमीला स्वतःच्या शासकीय वाहनातून डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल केलं. जखमीला वेळेवर रुग्णालयात दाखल होऊन त्याच्यावर उपचार झाल्याने त्या व्यक्तीला जीवनदान मिळाले आहे.


जिल्हाधिकारी अमन मित्तल यांचं कौतुक 


जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्यातील तत्परतेमुळे आणि त्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधान आणि माणुसकीमुळे जखमी व्यक्तीचे प्राण वाचले आहेत. या घटनेमुळे जिल्हाधिकारी अमन मित्तल यांचे कौतुक केलं जातं असून या कृत्याची जिल्ह्यात मोठी चर्चा होत असल्याचे पाहायला मिळत आहे.


ट्रक आणि बसचा समोरासमोर अपघात, 13 विद्यार्थ्यांसह 20 जण जखमी


जळगावात तीन दिवसांपूर्वी (18 जुलै) पाचोरा-मोंढाळा रस्त्यावर मौनगिरी साखर कारखान्यासमोर एसटी बस आणि ट्रकचा अपघात झाला होता. या अपघातात 13 विद्यार्थ्यांसह 20 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. पाचोरा आगाराची घोसला ते पाचोरा ही मुक्कामी बस प्रवासी आणि विद्यार्थ्यांना घेऊन पाचोऱ्याकडे येत असताना हा अपघात झाला. अपघातातील सर्व जखमींना पाचोऱ्यातील रुग्णालयात दाखल केलं होतं.


हेही वाचा


Jalgaon News:  जळगावमधील पुरातन वास्तूचा वाद; हायकोर्टाकडून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला अंतरीम स्थगिती