Jalgaon News: जळगावच्या एरंडोलमधील जामा मशिदीची (पांडव वाडा ) रचना मंदिराप्रमाणे असून त्याचे संपूर्ण बांधकामच अतिक्रमण असल्याची तक्रार दाखल केल्यानंतर जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याचा प्रश्न उपस्थित करून तहसीलदारांनी मशिदीचा ताबा घ्यावा असे आदेश दिले होते. मात्र, या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने स्थगिती दिली आहे. दोन आठवड्यांसाठी अंतरीम स्थगिती देण्यात आली आहे. पुढील सुनावणी दोन आठवड्यानंतर होणार आहे.
जुम्मा मशीद ट्रस्ट समितीने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना खंडपीठाने हे निर्देश दिले. पांडव वाडा संघर्ष समिती या संघटनेने संबंधित बांधकाम मंदिरासारखे असल्याचा दावा केला होता आणि त्यावर मुस्लिम धर्मीयांकडून अतिक्रमण केले जात असल्याचे त्यांनी म्हटले होते. तर, मशिदीची देखरेख करणाऱ्या ट्रस्टने किमान 1861 पासून वास्तूच्या संरचनेचे अस्तित्व दर्शवणाऱ्या नोंदी असल्याचा दावा केला आहे.
याचिकाकर्ते तथा जामा मशिदीचे विश्वस्त अल्ताफ खान नय्यूम खान यांचे वकील एस. एस. काझी यांनी या प्रकरणाबाबत सांगितले की, एरंडाेलमधील पांडव वाडा संघर्ष समितीने जिल्हाधिकाऱ्यांकडे स्थानिक जामा मशिदीतील रचना मंदिराप्रमाणे असल्याची तक्रार केली होती. त्यावर जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी 27 जून 2023 रोजी मशिदीच्या विश्वस्तांना नोटीस पाठवली. मात्र, त्याच दिवशी राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा जळगाव जिल्हा दौरा असल्याने सुनावणी 11 जुलै रोजी ठेवली. त्यामध्ये मशिदीच्या विश्वस्तांना बाजू मांडण्याची संधी न देताच जिल्हाधिकाऱ्यांनी मशिद परिसरात कलम 144 आणि 145 लागू करून एरंडोल तहसीलदारांना ताबा घेण्याचे आदेश दिले. त्या नाराजीने मशिदीच्या विश्वस्तांनी रीट याचिका दाखल करून संदर्भीत जागेचा त्वरीत ताबा देण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती केली.
याचिकेनुसार, मशीद अनेक दशकांपासून अस्तित्वात आहे आणि महाराष्ट्र सरकारने मशिदीची रचना प्राचीन आणि ऐतिहासिक वास्तू म्हणून घोषित केली होती, जी संरक्षित स्मारकांच्या यादीत समाविष्ट आहे.
पांडव वाडा संघर्ष समितीचा दावा काय?
पांडव वाडा संघर्ष समितीचे प्रसाद दंडवते यांनी केलेल्या दाव्यानुसार, हा पांडवकालीन पांडव वाडा आहे." "पांडव वाडा म्हणूनच ही पुरातन वास्तू आहे. 1995 मध्ये ही पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. अज्ञातवासात असताना एका ब्राह्मणाकडे याठिकाणी पांडवांनी आश्रय घेतला होता. याठिकाणी भीमाने बकासुरचा वध केला, अशी आख्यायिका या वास्तू बद्दल सांगितली जाते. त्यामुळे ही वास्तू पांडवकालीन आहे. पांडवकालीन वास्तूवर जुमा मशीद ट्रस्ट स्थापन करुन याठिकाणी मुस्लीम धर्मियांनी या वास्तूवर कब्जा केला आहे. प्रत्यक्षात ही वास्तू सरकारच्या पुरातत्व विभागाच्या ताब्यातील आहे आणि सीटी सर्व्हे उताऱ्यावर तसेच प्रपत्रावर याची नोंद पांडव वाडा अशी आहे," असं त्यांनी म्हटलं.
या पुरातन वास्तूंच्या ठिकाणी बेकायदेशीरपणे अतिक्रमण आणि या वास्तूवर कब्जा घेतला आहे. वेगळ्या जागेवर ट्रस्ट स्थापन करुन, कब्जा मात्र या वास्तूवर केला. तसेच या ठिकाणी सकाळी आणि संध्याकाळी मदरसे सुरु करण्यात आलेले ते सुद्धा बेकायदेशीररित्या आहेत. तो बंद करण्यात यावा. ही सरकारची वस्तू आहे, अतिक्रमण काढावे, मदरसे बंद करावे, ही वास्तू सरकार जमा करावी," अशी मागणी समितीच्यावतीने करण्यात आली होती.