जळगाव: प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj) हे आपल्या वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. यावेळी इंदुरीकर महाराजांनी राजकारणातील सत्यस्थितीवर भाष्य केलं आणि राजकारण्यांना चांगलेच टोले लगावले. आता आमदार होण्यासाठी दोन-चार कारखाने, पाच-सहा कॉलेज लागतात, असं वक्तव्य इंदुरीकर महाराजांनी केलं आहे. जळगावातील चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कीर्तन सोहळ्यात ते बोलत होते.


'कोण कुठल्या पक्षात काम करतोय, हेच कळेनासं झालं'


आता कोणतेही पक्ष राहिले नाही, असं इंदुरीकर महाराज म्हणाले. कोण कुठल्या पक्षात काम करतो, हे कळेनासं झालं आहे, असंही ते म्हणाले. कोण कोणत्या पक्षात हे सद्यस्थितीत कोणालाच कळत नाही, पक्ष कोणताही असुद्या, आपल्याला आपली माणसं सांभाळायची आहेत, असं इंदुरीकर महाराज यांनी म्हटलं आहे. पक्ष राहिला नाही, कधीही नवा पक्ष निघू शकतो, राजकारणाचं अवघड झालंय, असंही इंदुरीकर महाराज म्हणाले.


'आता आमदार होण्यासाठी दोन-चार कारखाने, पाच-सहा कॉलेज...'


राजकारण आता अवघड झालं आहे, त्यामुळे तुम्ही फक्त धर्मासाठी जागा, असा सल्ला इंदुरीकर महाराजांनी दिला. आता आमदार होण्यासाठीदोन-चार कारखाने, पाच-सहा कॉलेज, 100-200 पतसंस्था, 100-150 बचत गट आणि एक हजार कर्मचारी हाताखाली लागतात, तेव्हा आमदार होता येतं, असं इंदुरीकर महाराज म्हणाले. पण, मंगेश चव्हाण जनतेच्या आशीर्वादावर आमदार झाले आहेत, असं म्हणत त्यांनी आमदार मंगेश चव्हाण यांचं कौतुकही केलं. तर टोटल आमदारांचे वाढदिवस माझ्याकडे असतात, असंही इंदुरीकर महाराज म्हणाले.


गौतमी पाटीलचाही घेतला होता समाचार


मागे इंदुरीकर महाराजांनी गौतमी पाटीलचा देखील चांगलाच समाचार घेतला. गौतमी पाटीलचं उदाहरण देत समाजाच्या बदलत्या मानसिकतेवर कीर्तनकार इंदुरीकर महाराजांनी टीका केली होती. गौतमीच्या तीन गाण्यांसाठी तीन लाख मोजण्याची तयारी, पण आम्हाला टाळ वाजवूनही काही मिळत नाही, असं वक्तव्य इंदुरीकरांनी केलं होतं. आष्टी तालुक्यातील तवलवाडी येथे इंदुरीकर महाराजांचं कीर्तन ठेवण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते.


गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात मारामारी, राडा तर, तर काहींचे गुडघे फुटतात. आम्हाला मात्र टाळ वाजवून काहीही मिळत नाही, साधं संरक्षण देखील दिलं जात नाही, असं इंदुरीकर महाराज यांनी कीर्तनात म्हटलं होतं.


हेही वाचा:


Raj Thackeray : खड्डयावरून भाजप-मनसेत बिनसलं! मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यावरून राज ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका