जळगाव : राज्यात गेल्या काही दिवसांत अवकाळी पावसामुळे (Rain) वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. मात्र, पुन्हा एकदा उष्णतेच्या झळा सोसाव्या लागल्याचं दिसून येत आहे. मराठवाड्यासह विदर्भात पुन्हा एकदा उच्चांकी तापमानाची नोंद होत आहे. गेल्या 2 दिवसांपासून येथे सूर्य आग ओकत असून अंगाची लाहीलाही होत असल्याचे दिसून येत आहे. देशात सर्वाधिक तापमानाची (Temperature) नोंद राजस्थानमध्ये झाली आहे. राजस्थानशिवाय महाराष्ट्र, दिल्ली, पंजाब, हरयाणा, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्यातच, धुळे, जळगावमध्ये (Jalgaon) उष्णतेचा कहर पाहायला मिळत आहे. धुळे जिल्ह्यात तापमान 44 अंश सेल्सियसवर पोहोचले आहे. तर, जळगावमध्ये उन्हाच्या कडकाच्या फटक्यात चक्क वाहनाला आग लागल्याची घटना घडली आहे. काही ठिकाणी पुढील चार दिवसांसाठी रेड अलर्टही जारी करण्यात आला आहे


जळगाव जिल्ह्यातही सध्या उष्णतेची मोठी लाट पसरली असून या उष्णतेच्या लाटेमुळे वाहनांमध्ये आग लागण्याच्या घटना घडत आहेत. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात भवानी माथाजवळ जळगाव-औरंगाबाद रस्त्यावर अचानक एका ट्रकने पेट घेतल्याचे दिसून आले. या ट्रकमधून गव्हाच्या पोत्यांची वाहूतक करण्यात येत होती. गव्हाच्या पोत्यांनी भरलेल्या या ट्रकला आग लागल्यामुळे उन्हाची तीव्रता लक्षात येईल. दरम्यान, या घटनेनंतर अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले, मात्र अग्निशमनची बंब येईपर्यंत ट्रकचे जळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या घटनेमुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा उष्णतेची लाट आल्याचं बोलंलं जात आहे. त्यामुळे, नागरिकांनी दुपारच्या प्रहरात अनावश्यक घराबाहेर न पडण्याचा सल्लाही जाणकारांकडून देण्यात येत आहे. 


धुळे जिल्ह्यात 44 अंश सेल्सियस


धुळे शहरासह जिल्ह्यात तापमानाचा पारा 44 अंशावर जाऊन पोहोचला असून त्याचा जनजीवनावर परिणाम झाला आहे, तर दुसरीकडे वीज वितरण कंपनीकडून देखील ट्रान्सफार्मर ची विशेष काळजी घेतली जात असेल वाढत्या तापमानामुळे ट्रान्सफॉर्मर बंद पडू नये यासाठी ट्रान्स फार्मर जवळ कुलर लावण्यात आले आहेत, पुढील काही दिवसात तापमानात अधिक वाढ होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली असून नागरिकांनी काळजी घेण्याचे देखील आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे


राजस्थानात सर्वाधिक 48.8 अंश तापमान


देशात उन्हाची लाट पसरली असून उत्तर भारतात तीव्र उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसत आहे. राजस्थानात भीषण गर्मीमुळे एकाच दिवसांमध्ये 5 जणांचा मृत्यू झाला. राज्यातील बाडमेरमध्ये पारा 48.8 अंश सेल्सिअसवर नोंद झाला आहे. यंदाच्या उन्हाळ्यातील हे सर्वाधिक तापमान असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. दरम्यान, उष्णतेच्या लाटेमुळे महिनाभरात म्यानमार, बांगलादेश आणि थायलँडमध्ये गेल्या महिनाभरात 100 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानातील इतर ठिकाणी पारा 50 अंश सेल्सिअसवर पोहोचण्याचा अंदाज आहे. जालौरमध्ये एका महिलेसह दोन ज्येष्ठ नागरिकांचा उष्माघाताने मृत्यू झाला. आहोर आणि बालोतरा येथे दोन तरुणांचा मृत्यू झाला. 


एवढी भीषण उष्णतेची लाट कशामुळे?


अमेरिकेच्या नॅशनल ओशनिक अँड अॅटमॉस्फेरिक अॅडमिनिस्ट्रेशनच्या अहवाला- नुसार अनेक देशांमध्ये रात्रीच्या वेळीही उष्णतेची लाट आहे. मे महिन्यात रात्रीचे सरासरी तापमान दिवसा- प्रमाणे वाढत आहे.
दक्षिण आशियामध्ये उष्णतेच्या लाटेचा धोका 45 पटीने वाढला आहे. दुसरीकडे, पश्चिम आशियामध्ये सीरिया, इस्रायल, पॅलेस्टाईन, जॉर्डन, लेबनॉनमध्ये हा धोका 5 पट वाढला आहे. 22 मे रोजी भारतातील 9 शहरांमध्ये तापमान 42 अंश सेल्सियस होते.